सावंतवाडी : विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा परीक्षेत कलंबिस्त हायस्कूलचा पारस दळवी सावंतवाडी तालुक्यात प्रथम

शेअर करा

तर ऋतुजा सावंत तालुक्यात द्वितीय

सावंतवाडी,दि.०३ जुलै

महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठी भाषा विभाग’ व ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकरिता ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा परीक्षा’ आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.​या स्पर्धेत कलंबिस्त हायस्कूलचा विद्यार्थी पारस देविदास दळवी याने सावंतवाडी तालुक्यात ग्रामीण स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर याच प्रशालेची विद्यार्थिनी कु. ऋतुजा संतोष सावंत हिने द्वितीय क्रमांक प्राप्त करून विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे सहाय्यक शिक्षक किशोर वालावलकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
​विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या दैदीप्यमान यशाबद्दल कलंबिस्त हायस्कूलचे संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक व अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे कलंबिस्त गावाचे आणि शाळेचे नाव तालुक्यात उंचावले असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा