ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अणावकर यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रासह बिडवाडी परिसरात हळहळ
कणकवली,दि.०८ ऑगस्ट
बिडवाडी माध्यमिक विद्यालयाचे प्रथम व सेवा निवृत्त मुख्याध्यापक, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ शशिकांत अणावकर (वय ७७ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने बिडवाडी परिसरासह माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
श्री. अणावकर यांनी बिडवाडी माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. प्रेमळ, मनमिळाऊ आणि आपुलकीचा स्वभाव असतानाच शिस्तीच्या बाबतीत ते कडक होते. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत यश संपादन केले.
विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले मार्गदर्शन कायम स्मरणात राहील. शिक्षक म्हणून ज्ञानदानाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले.
त्यांच्या निधनाने बिडवाडी पंचक्रोशीतील शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत अनेक माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले.
शशिकांत अणावकर यांच्या पश्चात भाऊ, पुतणे तसेच आप्तेष्ट असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल बिडवाडी पंचक्रोशी शिक्षण संस्था, बिडवाडी ग्रामविकास संस्था, बिडवाडी ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.