आरोग्य तपासणी व विविध कार्डांसाठी मिळाले मोफत सहाय्य;शिबिराचा सुमारे ३५ लाभार्थ्यांनी घेतला लाभ
कणकवली,दि.११ ऑगस्ट
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्यासाठी तळेरे येथे आयोजित करण्यात आलेले मोफत सहाय्य शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिराचा सुमारे ३५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
या शिबिराला कणकवलीचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी उपस्थिती लावली. शासनाच्या विविध योजना व सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावागावात अशा प्रकारचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. त्यातून लोकाभिमुख प्रशासनाचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. त्यांचे मार्गदर्शन उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.
यावेळी कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर, माजी सरपंच शशांक तळेकर, प्रवीण वरुणकर, उपसरपंच संदीप घाडी, माजी उपसरपंच दिनेश मुद्रस, ग्रामपंचायत सदस्य रिया चव्हाण, शैलेश सुर्वे, स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, जि. प. शाळा तळेरे नं. १ चे व्यवस्थापन समिती सदस्य सुयोग तळेकर, वामनराव महाडीक विद्यालय स्थानिक शाळा समिती सदस्य उमेश कदम, युवा कार्यकर्ते चिन्मय तळेकर यांच्यासह ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या माध्यमातून हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्यासाठी सहाय्य देण्याबरोबरच आरोग्य विभागामार्फत नागरिकांना विविध आरोग्यविषयक सुविधा व मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये ईसीजी, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय आयुष्मान कार्ड, आभा कार्ड व वयोवंदना कार्डासाठीही मोफत सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले.
या उपक्रमासाठी तळेरे आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे, ग्रामपंचायत अधिकारी राजलक्ष्मी जाधव व कर्मचारी तसेच ग्राम महसूल अधिकारी काळभेरे व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ऑनलाइन प्रक्रियेसाठी ई-सेवा केंद्र चालक यश वायंगणकर यांनी सहकार्य केले. जि. प. शाळा तळेरे नं. १ चे माजी अध्यक्ष राजेश जाधव यांनी मेहनत घेतली.
या सर्वांच्या सहकार्यामुळे शिबिर अपेक्षित उद्दिष्ट साध्य करत यशस्वीपणे पूर्ण झाले. उपस्थित मान्यवर, अधिकारी-कर्मचारी, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व महसूल प्रशासन, ई-सेवा केंद्र, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि लाभार्थी यांच्या सहकार्याबद्दल सरपंच हनुमंत तळेकर यांनी आभार व्यक्त केले.