कणकवली : घोटगे ग्रामपंचायत हद्दीत व्यायामशाळेचे चुकीच्या ठिकाणी बांधकाम

शेअर करा

ग्रा.प.सदस्य पंढरीनाथ गुरव यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार; व्यायामशाळेच्या इमारतीची जागा न बदलल्यास तीव्र आंदोलन

कणकवली,दि.१४ जुलै

तालुक्यातील घोटगे ग्रामपंचायत येथील प्रस्तावित व्यायामशाळेचे बांधकाम नियोजित जागेऐवजी चुकीच्या ठिकाणी सुरू सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी ओहोळ लागून असून किमान अंतर सोडण्यात आलेले नाही. तसेच दुस-या बाजुला रस्त्यालगत किमान अंतर न सोडता व्यायामशाळेच्या बांधकामासाठी चरीची खोदाई करण्यात आलेली आहे. यासंदर्भात घोटगे ग्रामपंचायत मध्ये मासिक मिटींगमध्ये देखील संबंधित व्यायामशाळेची जागा बदला अशी देखील मागणी ग्रा.प.सदस्य पंढरीनाथ गुरव यांनी केली होती. तरीदेखील ग्रामपंचायतने त्याकडे दुर्लक्ष करत ठेकेदाराच्या संगनमताने काम सुरु केले आहे. याविरुध्द तातडीने व्यायामशाळेचे काम थांबवण्यासाठी लेखी तक्रार जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाखल करत या प्रकरणाची तात्काळ पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी पंढरीनाथ गुरव यांनी केली आहे.

घोटगे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ (बाळा) ज्ञानदेव गुरव यांनी १४ जुलै रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घोटगे ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा क्रीडा विभागामार्फत व्यायामशाळेचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे बांधकाम मंजूर जागेऐवजी दुसऱ्याच ठिकाणी होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.संबंधित ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध नसून एका बाजूला रस्ता तर दुसऱ्या बाजूला ओहोळ आहे. अशा चिंचोळ्या जागेत शासकीय नियमांचा विचार न करता बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात वाहतूक, सार्वजनिक हित तसेच व्यायामशाळेचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.याबाबत प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून बांधकाम तात्काळ थांबवावे आणि योग्य जागेवरच व्यायामशाळेचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने पंढरीनाथ गुरव यांनी केली आहे.
सदर व्यायामशाळेसाठी 12 लाखांचा निधी मंजुर झाला आहे. आलेल्या निधीचा योग्य तो वापर व्हावा, त्या व्यायामशाळेच्या माध्यमातून तरुणांचे सुदृढ जीवन बनवण्यासाठी गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेवून चांगली पर्यायी जागा ठरवावी, अन्यथा घोटगे गावातील ग्रामस्थांना घेवून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रा.प.सदस्य पंढरीनाथ गुरव यांनी दिला आहे.

शेअर करा