कणकवली : 21 रोजी कणकवलीतील निविदा रद्दच्या ठरावावरील होणार सुनावणी

शेअर करा

कणकवली ,दि.०७ ऑगस्ट

कणकवली नगरपंचायतीने ६ एप्रिल २०२६ रोजी स्थायी समितीत व १३ एप्रिल रोजी विशेष सभेत २१ निविदा रद्द करण्याच्या घेतलेल्या ठरावाविरोधात मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. याबाबतची पुढील सुनावणी २१ ऑगस्ट रोजी होणार आहे.
एप्रिलमध्ये झालेल्या ठरावानंतर तीन दिवसांत मुख्याधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा-नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ३०८ (१) नुसार अर्ज दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, तशी कार्यवाही झाली नाही. याबाबत नगरसेवक बंडू हर्णे यांनी दाखल केलेला अर्ज उच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनी दाखल केलेला नसल्याने फेटाळण्यात आला होता. तसेच संबंधित ठराव शासन निर्देशाशी सुसंगत नसल्याचा उल्लेख निकालपत्रात होता.

या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी १८ जून २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा ठराव शासन निर्देशाशी सुसंगत नसल्याने सभेचे इतिवृत्त कायम करणे याविषयी सूचीमध्ये कायम करता येणार नाही, या सदराखाली कलम ३०८ एक नुसार या ठरावाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यावतीने अॅड. उमेश सावंत काम पाहत आहेत.

शेअर करा