कणकवली : लोरे नं. १ येथे भात पिकावरील करपा रोगाची पाहणी

शेअर करा

कणकवली,दि.११ ऑगस्ट

तालुक्यातील मौजे लोरे नं. १ येथे भात पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दि. ११ ऑगस्ट रोजी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन बाधित भात प्रक्षेत्राची पाहणी केली.

कृषी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. यशवंत गोवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ, सरपंच अजय रावराणे यांच्या उपस्थितीत ही पाहणी करण्यात आली. यावेळी लोरे नं. १ येथील शेतकऱ्यांच्या भात पिकाची पाहणी करून करपा रोगाच्या नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावर्षी पावसाची अनियमितता तसेच भात लागवड उशिरा झाल्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे डॉ. गोवेकर यांनी सांगितले. रोगाचे व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने करणे आवश्यक असून जमिनीत ट्रायकोडर्मा तसेच जैविक बुरशीनाशकांचा वापर केल्यास रोग नियंत्रणास मदत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

पेरणीपूर्वी बियाण्याची मिठाच्या द्रावणाद्वारे तसेच योग्य बुरशीनाशकाद्वारे बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. जमिनीच्या प्रकारानुसार रोगप्रतिकारक भात वाणांची निवड करावी. तसेच बियाणे पेरणीपूर्वी व भात लागवडीपूर्वी बांधावरील तणांचा नाश करावा. सेंद्रिय खते तसेच नीम, स्फुरद व पालाशयुक्त खतांचा संतुलित वापर करण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला.

करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर पावसाची उघडीप पाहून आयसोप्रोथिओलेन ४० टक्के ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर १५ दिवसांनी डायसायक्लोझोल ७५ टक्के डब्ल्यूपी १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दुसरी फवारणी करण्याचे मार्गदर्शन डॉ. गोवेकर यांनी केले. पावसाचे प्रमाण लक्षात घेता फवारणीच्या द्रावणात सिलिकॉन स्टिकर ७ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापरण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी लोरे नं. १ येथील सुमन गुरव, हरिश्चंद्र मोसकर, कैलास मोसकर, संतोष राणे, संजय रावराणे, प्रतिभा रावराणे, स्वप्ना नवले, प्रमोद तेली आदी शेतकऱ्यांच्या भात पिक प्रक्षेत्राची पाहणी करण्यात आली.

यावेळी उपकृषी अधिकारी फोंडाघाट मानसी वेर्लेकर, सहायक कृषी अधिकारी अक्षया परब तसेच लोरे नं. १ गावातील शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा