कणकवली : वृक्षारोपणातून पर्यावरण संस्कारांची पेरणी

शेअर करा

शिवडाव माध्यमिक विद्यालयातील उपक्रम ठरला विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी

कणकवली ,दि.२६ जुलै

पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक बांधिलकी आहे. ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच रुजावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाच्या दिगवळे परिमंडळाच्या वतीने शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव येथे आयोजित करण्यात आलेला सुरंगी वृक्षारोपणाचा उपक्रम सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचा ठरला.

आजच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांना पर्यावरणाशी प्रत्यक्ष जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता न राहता प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेल्या रोपाचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, हा संदेशही यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते विद्यालय परिसरात सुरंगी रोपांची लागवड करण्यात आली. शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यरेखा दळवी, मुख्याध्यापक मुकेश पवार, वनाधिकारी सदाशिव शामराव वागरे, वनरक्षक शिवाजी मनोहर पाटील, मयुरेश विलास करंगुटकर, कु. अंजली संजय सुतार तसेच आनंद अशोक पार्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वनाधिकारी सदाशिव वागरे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक महत्त्व समजावून सांगितले. वाढते तापमान, पाण्याची टंचाई आणि जैवविविधतेचे संरक्षण या सर्व समस्यांवर वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्याध्यापक मुकेश पवार यांनी शाळांमध्ये अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता, सामाजिक जबाबदारी आणि निसर्गप्रेमाची भावना विकसित होत असल्याचे सांगितले. शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून मूल्यसंस्कार घडविण्याचे माध्यम आहे. वृक्षारोपणासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना जबाबदार आणि पर्यावरणपूरक नागरिक बनविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

विद्यालयात राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणारा आणि भावी पिढीमध्ये निसर्गसंवर्धनाची बीजे रुजविणारा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शेअर करा