उत्कर्ष मंडळाच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; ढोल-ताशांच्या गजरात श्रीकृष्ण मूर्तीचे किल्ल्यावर आगमन
देवगड,दि.०४ सप्टेंबर
‘गोपाल कृष्ण महाराज की जय’, ‘गोविंदा रे गोपाळा’ आणि ‘बजरंग बली की जय’ अशा भक्तिमय जयघोषांनी देवगड किल्ला परिसर दुमदुमून गेला. उत्कर्ष मंडळाच्या वतीने देवगड किल्ल्यावरील हनुमान मंदिर येथे गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
या उत्सवानिमित्त उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर देवगड बाजारपेठेतून ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात श्रीकृष्णाची मूर्ती मिरवणुकीने देवगड किल्ल्यावरील हनुमान मंदिरात आणण्यात आली. यावेळी ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
जगतापवाडी येथून आणण्यात आलेल्या श्रीकृष्ण मूर्तीचे बाजारपेठेत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा, धार्मिक विधी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीकृष्णाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होत उत्सवाचा आनंद घेतला.
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने देवगड किल्ला परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. उत्कर्ष मंडळाच्या या उपक्रमातून धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी महेश नेसवणकर, शिवराम निकम, उल्हास मंचेकर, राजा निकम, केदार तेली, गुरु वाडेकर, चंद्रकांत पाळेकर, शरद शिंदे, रमेश कोयंडे, सूर्यकांत पाळेकर, प्रकाश भोर, बाबू नेसवणकर, रमेश गोळवणकर, अभय जाधव, श्रीराम पाळेकर, अशोक गोळवणकर, विजय नेसवणकर, विनोद हरम, पांडुरंग मंचेकर, बंटी भाबल, बंटी वाडेकर यांच्यासह उत्कर्ष मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.