वैभववाडी : खांबाळे बीएसएनएल टॉवरला वीज बॅकअप सुविधा

शेअर करा

खासदार नारायण राणे यांच्या पुढाकाराने प्रश्न मार्गी; पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पाठपुरावा

वैभववाडी,दि.०४ सप्टेंबर

तालुक्यातील खांबाळे येथील बीएसएनएल मोबाईल टॉवरला अखेर वीज बॅकअपची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही गावातील मोबाईल नेटवर्क सेवा सुरू राहणार असून, ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खांबाळे येथील बीएसएनएल टॉवरला यापूर्वी पर्यायी वीज व्यवस्था उपलब्ध नसल्याने वीज गेल्यानंतर मोबाईल नेटवर्क सेवा बंद पडत होती. परिणामी ग्रामस्थांना मोबाईल संपर्कासह ऑनलाइन शासकीय कामकाज, बँकिंग व्यवहार तसेच आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधताना अडचणींचा सामना करावा लागत होता.

ही समस्या पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर खासदार नारायण राणे यांनी दूरसंचार विभागाचे प्रबंधक रविकिरण जन्नू यांना पत्र देऊन खांबाळे बीएसएनएल टॉवरला वीज बॅकअप सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली होती.

या पाठपुराव्याला यश आले असून संबंधित विभागाने खांबाळे येथील बीएसएनएल टॉवरसाठी वीज बॅकअप यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता वीजपुरवठा खंडित झाला तरी मोबाईल नेटवर्क सेवा सुरू राहण्यास मदत होणार आहे.

खासदार नारायण राणे यांच्या पुढाकाराने, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून झालेल्या पाठपुराव्यामुळे आणि पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे खांबाळे ग्रामस्थांचा अनेक दिवसांचा प्रश्न मार्गी लागला आहे. वीज बॅकअपची सुविधा मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, संबंधितांचे आभार मानले आहेत.

शेअर करा