कणकवली भाजी मार्केटसाठी जागेचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार

शेअर करा

शासनाकडून पुढील कार्यवाहीचे जिल्हाधिकाºयांना निर्देश : जमिनीचे बाजारमूल्य 19 लाख ४३१ रुपये निश्चित

कणकवली,दि.०४ सप्टेंबर

कणकवली शहरातील भाजी मार्केटच्या विकासासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला आता पुढील प्रशासकीय कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे. मौजे कणकवली येथील सर्व्हे क्रमांक व हिस्सा क्रमांक १९८ व २ मधील शासकीय जमिनीपैकी ३.२५ आर क्षेत्र भाजी मार्केटसाठी कणकवली नगरपंचायतीला देण्याबाबतचा प्रस्ताव महसूल व वन विभागाने जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे परत पाठविला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर आता जिल्हाधिकारी स्तरावर निर्णय होणार असल्याची माहीती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.


महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबईचे कक्ष अधिकारी संदीपान देवणे यांनी १४ आॅगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांना याबाबत पत्र पाठविले आहे. या पत्रानुसार मौजे कणकवली, ता. कणकवली येथील सर्व्हे नं./ हिस्सा नं. १९८ व २ मधील एकूण ०-०७-०० हेक्टर क्षेत्रापैकी ०-०३-२५ आर क्षेत्र भाजी मार्केटसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. सदर जमीन शासकीय नोंदीत महाराष्ट्र शासन व इतर अधिकारी यांच्या मालकीची असल्याचे नमूद आहे. कणकवली नगरपंचायतीला या जागेचा भाजी मार्केटच्या उपयोगासाठी ताबा देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर सादर करण्यात आला होता. या जमिनीचे बाजारमूल्य 19 लाख ४३१ रुपये इतके असल्याचे महसूल विभागाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. शासकीय जमीन वितरणासंदर्भात ८ आॅगस्ट २०१९ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींचाही या प्रकरणात संदर्भ घेण्यात आला आहे.


या प्रकरणाची छाननी केल्यानंतर संबंधित शासकीय जमीन वितरणाचे प्रकरण जिल्हाधिकाºयांना प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकाराच्या मयदित येत असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदर प्रस्तावावर शासन स्तरावरून स्वतंत्र निर्णय घेण्याची आवश्यकता नसून, प्रचलित शासन धोरणानुसार जिल्हाधिकारी स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडून या प्रकरणी अहवाल व प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर महसूल व वन विभागाने प्रस्तावाची छाननी करून तो मूळ संचिकेसह जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे परत पाठविला आहे.
कणकवली शहरातील भाजी मार्केटसाठी शासकीय जागा उपलब्ध झाल्यास बाजारपेठेतील विक्रेत्यांसाठी अधिक नियोजनबद्ध व्यवस्था उभारण्यास मदत होणार आहे. तसेच भाजी विक्रेत्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि बाजारपेठेचे नियोजन करणे नगरपंचायतीला शक्य होणार आहे, असा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला.

शेअर करा