महसुलमंत्र्यांकडे सदर जमीनीच्या भुखंडाची केली होती मागणी : जिल्हाधिकाºयांनी तातडीने निर्णय घ्यावा
कणकवली,दि.०४ सप्टेंबर
कणकवली शहरातील भाजी मार्केटच्या विकासासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला आता पुढील प्रशासकीय कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे. मौजे कणकवली येथील सर्व्हे क्रमांक व हिस्सा क्रमांक १९८ व २ मधील शासकीय जमिनीपैकी ३.२५ आर क्षेत्र भाजी मार्केटसाठी कणकवली नगरपंचायतीला देण्याबाबतचा प्रस्ताव महसूल व वन विभागाने जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे परत पाठविला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर आता जिल्हाधिकारी स्तरावर निर्णय होणार असल्याने तातडीने निर्णय घ्यावा, याबाबत आपण महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र दिल्याचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे सांगितले.

कणकवली नगरपंचायतीला या जागेचा भाजी मार्केटच्या उपयोगासाठी ताबा देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर सादर करण्यात आला होता. या जमिनीचे बाजारमूल्य १९ लाख ४३१ रुपये इतके असल्याचे महसूल विभागाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. शासकीय जमीन वितरणासंदर्भात ८ आॅगस्ट २०१९ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींचाही या प्रकरणात संदर्भ घेण्यात आला आहे. सदर प्रस्तावावर शासन स्तरावरून स्वतंत्र निर्णय घेण्याची आवश्यकता नसून, प्रचलित शासन धोरणानुसार जिल्हाधिकारी स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडून या प्रकरणी अहवाल व प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर महसूल व वन विभागाने प्रस्तावाची छाननी करून तो मूळ संचिकेसह जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे परत पाठविला आहे. मी दिलेल्या पत्रानुसार मला जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन २७ आॅगस्टला पत्र प्राप्त आहे.त्यामुळे कणकवली शहरातील व्यापाºयांसाठी भाजी मार्केट जमीनीचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.