कणकवली : विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत मैदानी खेळातही नाव कमवावे

शेअर करा

सिंधुपुत्र प्रतिष्ठान व रामवाडी विकास मंडळाचा सामाजिक उपक्रम; १२५ विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वाटप

कणकवली,दि.०८ सप्टेंबर

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच मैदानी खेळांमध्येही प्रगती करून गाव, शाळा आणि आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे. खेळामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्यही चांगले राहते. सिंधुपुत्र प्रतिष्ठान कोळोशी आणि रामवाडी विकास मंडळ हडपिड यांच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणारे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन कोळोशी-हडपिड हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी गर्जे यांनी केले.

शिक्षण प्रसारक मंडळ कोळोशी-हडपिड मुंबई संचलित माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी-हडपिड हायस्कूलमधील एकूण १२५ विद्यार्थ्यांना सिंधुपुत्र प्रतिष्ठान कोळोशी व रामवाडी विकास मंडळ हडपिड यांच्या सौजन्याने क्रीडा गणवेशाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह सुरेश राणे, चेअरमन संतोष चव्हाण, माजी चेअरमन विद्याधर खोत, माजी चेअरमन किशोर राणे, रामवाडी विकास मंडळाचे रमेश राणे, सदस्य विश्वनाथ कदम, चंद्रकांत शिंदे, शंकर राणे, सिंधुपुत्र प्रतिष्ठानचे उत्तम सावंत, दीपक चव्हाण, शैलेश इंदप, सुशील इंदप, मयुर राणे, हरेश सावंत, अमित इंदप ,अजय मेस्त्री, विघ्नेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका अश्विनी गर्जे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना विविध दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून मदत मिळत आहे. या मदतीचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घ्यावे आणि आई-वडिलांनी घेतलेले कष्ट सार्थकी लावावेत.

सिंधुपुत्र प्रतिष्ठानचे उत्तम सावंत यांनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. पालकांनीही मुलांना खेळासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. खेळामुळे विद्यार्थी विविध क्षेत्रात पुढे जाण्यासोबतच त्यांचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी सिंधुपुत्र प्रतिष्ठानचे सदस्य सर्वतोपरी सहकार्य करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

माजी चेअरमन तथा विद्यमान सदस्य किशोर राणे यांनी सिंधुपुत्र प्रतिष्ठानचे सर्व सदस्य तसेच रामवाडी विकास मंडळाचे आभार मानत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, सिंधुपुत्र प्रतिष्ठानचे ज्येष्ठ खेळाडू व प्रशिक्षक दीपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला सिंधुपुत्र प्रतिष्ठान, मित्रपरिवार तसेच क्रीडा व शिक्षणप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी स्वखुशीने मदत केल्याने हा उपक्रम यशस्वी झाला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने क्रीडा गणवेशाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्येही या उपक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

शेअर करा