कणकवली,दि.०८ सप्टेंबर
विषारी द्रव्य प्राशन केल्याने उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विषारी द्रव्य प्राशन केल्याने अत्यवस्थ झालेल्या रजत रामचंद्र हिर्लेकर (वय ५३, रा. हिंदळे, ता. देवगड) यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू होऊन अवघी काही मिनिटे झाली असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
रजत हिर्लेकर यांनी हिंदळे परिसरातच दुपारच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले. प्रकृती अत्यवस्थ बनल्याने त्यांना उपचारासाठी सुरुवातीला मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्यांना सायंकाळी ३.४५ वा. सुमारास कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे चार वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत खाजगी डॉक्टरांनी कणकवली पोलिसांशी संपर्क साधला. सदरची माहिती कणकवली पोलिसांनी देवगड पोलिसांना दिली. त्यानंतर देवगड पोलीस घटनेच्या तपासासाठी कणकवलीला येणार आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास देवगड पोलीस ठाण्यामार्फत करण्यात येत असून, गुन्हा नोंदविण्याची पुढील कार्यवाही देवगड पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होती.