कणकवली : शेअर्समध्ये मोठा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १ कोटी ४८ लाखांची फसवणूक

शेअर करा

, दोन वर्षांपासून फरार आरोपीला अटक

कणकवली ,दि.२५ सप्टेंबर

शेअर्स खरेदी करून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांच्या नजरेआड असलेल्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नसरापूर, पुणे येथून शिताफीने अटक केली. विवेक विजय पार्टे (वय ५३, रा. नसरापूर, बालाजी कलेक्शन, ता. भोर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ तसेच MPID Act 1999 मधील कलम ३ व ४(१) नुसार २७ फेब्रुवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात फिर्यादी, साक्षीदार व ठेवीदारांची मिळून एकूण १ कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या गुन्ह्यातील आरोपी विवेक विजय पार्टे आणि वेदिका विवेक पार्टे हे गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना मिळून येत नव्हते. मागील दोन वर्षांपासून त्यांचा शोध घेण्यात येत होता. त्यांच्या वास्तव्याबाबतही पोलिसांना ठोस माहिती मिळत नव्हती.

वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त केले. पथकाने आरोपींच्या पार्श्वभूमीची माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधला. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे सापळा रचून २४ सप्टेंबर २०२६ रोजी विवेक पार्टे याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी त्याला आर्थिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग येथे हजर करण्यात आले आहे.

दरम्यान, विवेक पार्टे याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. ४८/२०२४, भादंवि कलम ४०६ व ४२० अन्वयेही गुन्हा दाखल असून, त्या प्रकरणातही तो पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

पोलिसांना गेल्या दोन वर्षांपासून गुंगारा देत असलेल्या आरोपीला शोधून अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सनिल पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रुपाली खानोलकर आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश ओटवणेकर यांच्या पथकाने केली.

शेअर करा