कणकवली : कणकवली शहराच्या विकासासाठी दरवर्षी २०० कोटी निधी आणणार

शेअर करा

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची ग्वाही : निम्मेवाडीत श्री स्वयंभू नमो उद्यानाचे भूमिपूजन

कणकवली,दि.१५ जून

कणकवली शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याचा आमचा मानस आहे. शहराचा शाश्वत व सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून दरवर्षी २०० कोटी रुपये आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कणकवली शहराला आदर्श शहर बनविण्यासाठी माझी टीम व प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. निम्मेवाडी येथे श्री स्वयंभू नमो उद्यानाचे भूमिपूजन झाले आहे. या उद्यानाचे लोकार्पण सोहळा राज्यातील मंत्र्यांच्या उपस्थित होईल. कणकवली शहरात ४ व्यापारी संकुलांची उभारली केली जातील, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.


शहरातील निम्मेवाडी येथे शासनाच्या वैशिष्टपूर्ण निधीतून श्री स्वयंभू नमो उद्यान साकारले जात आहे. या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी श्री. पारकर बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील, न. पं. चे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, राष्टÑवादी (श.पा.)चे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, वंचितचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे, नगरसेवक रुपेश नार्वेकर, राकेश राणे, संकेत नाईक, जयेश धुमाळे, लुकेश कांबळे, नगरसेविका दीपिका जाधव, जाई मुरकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, मनसेचे तालुकाध्यक्ष शांतराम सादये, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर आदी उपस्थित होते.


श्री. पारकर म्हणाले, कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले. निवडणुका संपल्या असून नागरिकांना विश्वासात घेऊन कणकवली शहराचा सर्वांगीण विकास करणे हे माझे ध्येय आहे. याकरिता माझी टीम व प्रशासन अहोरात्र काम करीत आहे. अतिक्रमणांमुळे शहराचे विद्रूपीकरण झाले. त्यामुळे सीईओंनी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कणकवली शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नगराध्यक्ष म्हणून मला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. ते मी निर्णय घेत आहे. कणकवली शहरवासीयांची विकासबाबत जी जी स्वप्ने आहेत, ती पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला शहरवासीयांनी साथ आणि सहकार्य करावे, असे आवाहन पारकर यांनी केले.


राजन तेली म्हणाले, राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून कणकवली शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नगराध्यक्ष संदेश पारकर व त्यांची टीम आणि प्रशासन काम करीत आहे. कणकवली शहर हे एक व्यापारी केंद्र आहे. त्यामुळे शहरात नागरिकांनी नेहमीच वर्दळ असते. परंतु शहरात सुलभ प्रसाधानगृह व शौचालय नसल्याने महिलांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात प्रसाधानगृह व शौचालय उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुशांत नाईक म्हणाले, कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करीत आहोत. शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून या प्रयत्नांनी शहरवासीयांनी आम्हाला सहकार्य करावे. शहरातील अतिक्रमणे हटविल्याबद्दल मी सीईओ गौरी पाटील यांचे कौतुक करतो. श्री स्वयंभू नमो उद्यानामुळे निम्मेवाडी व सुतारवाडी परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. शहरातील आरक्षित असलेल्या जागांवर नगरपंचायतीच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविले जाणार आहेत. शहरातील उड्डाणपुलाखालील जागेचे नगरपंचायतीच्या माध्यमातून सुशोभिकरण केले जाणार आहे.


गौरी पाटील म्हणाल्या, कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना पायभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यापुढील काळात विविध विकासकामे शहरात होणार आहेत. या कामांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. उद्यानाच्या भूमिपूजन सोहळ्याला आबाजी राणे, सदहेव बागवे, दिगंबकर पिळणकर, विजय राणे, सुनील परब, सुरेश राणे, जर्नादन पाटील, संजय मालंडकर, दिवाकर मुरकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, उमेश वाळके, विलास कोरगावकर, महेश कोदे, रामदास मांजरेकर, तेजस राणे, धीरज मेस्त्री, सिद्धेश रावराणे, सौरभ पारकर, सोहम वाळके, अमित मांडवकर, रिना जोगळे, दिव्या साळगावकर, शीतल मांजरेकर, नगरपंचायतीचे मनोज धुमाळे, सतीश कांबळे, विभव करंदीकर, ध्वजा उचले, सचिन नेरकर, रवी म्हाडेश्वकर, सुचिता ताम्हाणेकर, प्रवीण गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

जनता दरबार घेणार

कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. शहराचा शाश्वत व सर्वांगीण विकास करण्यासाठी नावीन्यपूर्ण विकासाच्या संकल्पना राबविण्याचा माझा मानस आहे. शहरवासीयांची शहराच्या विकासाबाबत काही स्वप्ने व संकल्पना आहेत. ही जाणून घेण्यासाठी व जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी लवकरच जनता दरबार आयोजित केला जाईल, अशी घोषणा संदेश पारकर यांनी केली.

शेअर करा