कणकवली,दि.२१ सप्टेंबर
देवगड तालुक्यातील बुरंबावडे येथील जमीन-मिळकतीसंदर्भातील एस.आर. २०/२०२५ या प्रकरणात तत्कालीन तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाविरोधात न्याय मिळावा, या मागणीसाठी ८५ वर्षीय निर्मला दत्ताराम नार्वेकर यांनी महात्मा गांधी जयंतीदिनी, २ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी २१ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर करून तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे.
नार्वेकर यांनी निवेदनात नमूद केल्यानुसार, संबंधित जमीन-मिळकतीच्या प्रकरणात तत्कालीन तहसीलदार, देवगड यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्या विरोधात आदेश पारित केला. उपलब्ध कागदपत्रे, महसूल अभिलेख, वस्तुस्थिती तसेच आपल्या कायदेशीर हक्कांचा योग्य विचार न करता हा आदेश देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे सदर आदेशाची स्वतंत्र चौकशी करून त्याची कायदेशीरता व आदेश पारित करताना अवलंबिलेल्या प्रक्रियेची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणातील पक्षकारांना योग्य व पुरेशी सुनावणीची संधी देण्यात आली होती का, तसेच महसूल अभिलेख आणि उपलब्ध पुराव्यांचा वस्तुनिष्ठ विचार करण्यात आला होता का, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आदेश पारित करण्यामागे पूर्वग्रह अथवा अनुचित प्रभाव होता का, याचीही निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत आर्थिक गैरव्यवहार अथवा अनुचित आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय निर्माण करणारी परिस्थिती असल्याचा दावा नार्वेकर यांनी निवेदनात केला असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी सक्षम प्राधिकरणामार्फत करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
आपले वय ८५ वर्षे असून उपोषणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मात्र, न्याय मिळावा आणि आपल्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण व्हावे, या मागणीसाठी २ ऑक्टोबरपासून शांततामय उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित आदेशाची तातडीने चौकशी करावी, आदेशाची कायदेशीरता व प्रक्रिया तपासावी, संबंधित अधिकाऱ्यांकडून पक्षपाती अथवा अनुचित कार्यवाही झाली आहे का, याची निष्पक्ष चौकशी करावी, तसेच आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयाची सक्षम प्राधिकरणामार्फत चौकशी करावी, अशा विविध मागण्या नार्वेकर यांनी केल्या आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर आदेशाच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही न झाल्यास घटनात्मक व कायदेशीर अधिकार अबाधित ठेवून शांततामय आंदोलन सुरू ठेवावे लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, कोकण विभाग, तहसीलदार देवगड आणि प्रांताधिकारी देवगड यांनाही देण्यात आल्या आहेत.