कणकवली,दि.२३ सप्टेंबर
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांशी मारहाण, शिवीगाळ तसेच रुग्णालयाच्या मालमत्तेची तोडफोड केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींची सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे ॲड. राजेंद्र रावराणे व ॲड. विलास परब यांनी काम पाहिले.
कासार्डे येथील स्मिता शिवाजी भोसले यांना श्वसनाच्या त्रासामुळे त्यांच्या मुलांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावत गेली. रात्रीच्या सुमारास प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांचे नातेवाईक व रुग्णालयातील डॉक्टर यांच्यात वाद झाल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
या प्रकरणात डॉ. नागेश पवार व डॉ. सौरभ सुरेश लिहितकर हे जिल्हा रुग्णालयात कार्यरत होते. रुग्णाची प्रकृती सुधारत नसल्याने तिला अन्यत्र उपचारासाठी नेण्याबाबत नातेवाईकांनी चर्चा केली. त्यानंतर डॉक्टरांशी वाद झाला. डॉ. लिहितकर यांचा हात पकडणे, शिवीगाळ करणे तसेच लोखंडी स्टूल उचलून मारण्यासाठी अंगावर धावून येणे, असा आरोप करण्यात आला होता.
दरम्यान, रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती मिळाल्यानंतर डॉक्टर ICU कडे जात असताना आरोपींनी त्यांना ICU च्या दरवाजात अडविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. राजेश याने डॉक्टरांना ठोसा मारून शर्ट पकडल्याचे, तर दत्तराज याने डॉक्टरांच्या उजव्या हाताचे बोट पकडून दुमडल्याचे तसेच सर्वांनी मिळून ढकलाढकली केल्याचे तक्रारीत नमूद होते. यावेळी ICU च्या दरवाजाची काच लोखंडी स्टूलने फोडून नुकसान केल्याचा आरोपही करण्यात आला होता. सुरक्षा रक्षकाने हस्तक्षेप करून डॉक्टरांना बाजूला केल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले.
या घटनेनंतर डॉ. लिहितकर यांनी ओरोस पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपींविरुद्ध भादंवि कलम 353, 332, 504, 506, 34 तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था संरक्षण अधिनियम 2010 मधील कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, याच घटनेच्या पहाटे स्मिता भोसले यांचे जिल्हा रुग्णालयात निधन झाले. रुग्णालयातील कथित निष्काळजीपणामुळे आईचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आरोपींनीही ओरोस पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
या प्रकरणाची सुनावणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात झाली. खटल्यात डॉ. लिहितकर, डॉ. पवार, पंच तसेच तपासिक अंमलदार यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. मात्र, घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही त्याचे फुटेज तपासात समाविष्ट करण्यात आले नसल्याचा मुद्दा बचाव पक्षाने उपस्थित केला. तसेच फिर्याद देण्यास झालेला विलंब, टिपणे उशिरा नोंदविणे आणि रुग्णालयाविरुद्ध आरोपींनी तक्रार दाखल केल्यामुळे रुग्णालयाची बदनामी होऊ नये, या उद्देशाने डॉक्टरांनी आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने न्यायालयासमोर केला.
न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांचा विचार करून आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध करण्यास पुरावा अपुरा असल्याचे मानत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे ॲड. राजेंद्र रावराणे व ॲड. विलास परब यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.