कणकवली : कणकवलीत ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न हाणून पाडला

शेअर करा

कंपनीचे अधिकारी व नागरिकांमध्ये बाचाबाची; काढलेले तीस मीटर पुन्हा लावण्यास भाग पाडले

कणकवली ,दि. ११ जून

कणकवली शहरातील डीसपी गार्डन या गृह निर्माण प्रकल्पातील ग्राहकांना पूर्वकल्पना न देता आणि विश्वासात न घेता स्मार्ट वीज मीटर बसविण्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला आहे. या गृहनिर्माण प्रकल्पातील तब्बल 30 मीटर अदानी कंपनीच्या कर्मचा-यांनी ग्राहकांना विश्वासात न घेता अचानक परस्पर बदलले. दरम्यान , ही बाब तेथीव वीज ग्राहकांनी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री , शहराध्यक्ष अण्णा कोदे , नगरसेविका मेघा गांगण यांच्या कानी घातला. त्यानंतर संबंधित कंपनीच्या अधिका-यांना जाब विचारला असता यावेळी संबंधित कंपनीचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. नागरिकांच्या एकजुटीमुळे काढून टाकण्यात आलेले जुने तीस पारंपरिक मीटर पुन्हा पूर्ववत बसविण्यास संबंधित कर्मचाऱ्यांना भाग पाडण्यात आले.
यावेळी कलमठ ग्रा.प.सदस्य अनुप वारंग , ग्रा.प.सदस्य पपु यादव , सचिन खोचरे , नितीन पवार , श्रेयश चिंदरकर यांच्यासह डीसपी गार्डनमधील नागरिक , तसेच अदानी कंपनीचे अधिकारी , कर्मचारी आणि वीजवितरणचे कर्मचारी उपस्थित होते.

कणकवली शाळा नं.5 नजीकच्या डीसपी गार्डन या गृहनिर्माण प्रकल्पातील नागरिकांचे महावितरण कंपनीकडून नेमलेल्या अदानी कंपनीच्या अधिकारी व कर्मचा-यांकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असताना अनेक ग्राहकांना याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नव्हती. तसेच स्मार्ट मीटरच्या वापरामुळे वीजबिलात वाढ होण्याची शक्यता, तांत्रिक अडचणी आणि ग्राहकांच्या हिताचे प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी स्मार्ट मीटरला विरोध दर्शविला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांकडे या योजनेबाबत सविस्तर माहितीची मागणी केली. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिक अधिक आक्रमक झाले. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. अखेर नागरिकांच्या दबावामुळे आधीच काढून ठेवलेले सुमारे तीस जुने मीटर पुन्हा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागरिकांनी स्पष्ट भूमिका घेत, ग्राहकांच्या संमतीशिवाय आणि योग्य जनजागृती न करता कोणत्याही प्रकारचे स्मार्ट मीटर बसवू देणार नसल्याचा इशारा संदीप मेस्त्री यांनी दिला. तसेच शासन व वीज वितरण कंपनीने प्रथम नागरिकांच्या शंका दूर कराव्यात, त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
बॉक्स –
कणकवलीतील चार हजार मीटर कसे बदलले ?
कणकवली शहरात चार हजार ग्राहकांचे स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत. हे मीटर बसवताना ग्राहकांचा अर्ज घेतला आहे का ? असा जाब मेघा गांगण यांनी विचारला. त्यावेळी कंपनीचे प्रतिनीधींनी अर्ज घेतल्याचे सांगितले. त्यावेळी ग्राहकांच्या संमत्तीशिवाय कणकवली शहरात स्मार्ट मीटर लावू नका , असा इशारा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी दिला आहे.

शेअर करा