कणकवली,दि.२२ सप्टेंबर
प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी राजन शांताराम पारकर (वय 61, रा. जळकेवाडी, कणकवली) यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. 30 जुलै 2026 रोजी बांदा पोलीस चेकपोस्ट येथे 5 लाख रक्कमेच्या मारुती इको कारमधून 3 लाख 22 हजार 300 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच मोबाईल असा मुद्देमाल बांदा पोलिसांनी पकडला होता.
बांदा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा क्रमांक 189/2026 दाखल असून, भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये मुख्य आरोपी आसिफ मेमन (रा.कोलगाव, सावंतवाडी) तसेच कृष्णा केळजी (रा. वेंगुर्ले), गणेश शिवगण (रा. जामसंडे देवगड), शिवाजी चव्हाण (रा.फणसोप, रत्नागिरी), राजन पारकर, (रा. जळकेवाडी, कणकवली) रवींद्र माणगावकर (बाजारपेठ, कणकवली) तपर्शि आमोणकर (रा. म्हापसा, गोवा) यांच्याविरोधात बांदा पोलीस ठाण्यात 30 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आरोपी राजन शांताराम पारकर याने जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाला हरकत घेत सरकारी वकील संदीप राणे यांनी पुढील मुद्दे मांडले. सदर गुन्हा लोकांच्या सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर स्वरूपाचा असून समाजहित लक्षात घेऊन आरोपी पारकरचा जामीन अर्ज नाकारावा, प्रतिबंधित गुटख्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून अशा गुन्ह्यात सहज जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असून आरोपीला कायद्याचा धाक राहणार नाही. वरील मुद्दे न्यायालयासमोर मांडत सरकारी वकील संदीप राणे यांनी आरोपी राजन पारकर याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली. आरोपीच्या वकिलांनी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी म्हणणे मांडले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायालयाने आरोपी राजन पारकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.