जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया संदीप मेस्त्री यांची पोलिसांकडे मागणी
कणकवली,दि.०७ सप्टेंबर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली, कलमठ, आचरा तसेच लगतच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चाकरमानी व भाविक दाखल होणार आहेत. या कालावधीत कणकवली–कलमठ–आचरा हा प्रमुख संपर्कमार्ग असल्याने या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया संदीप मेस्त्री यांनी पोलिसांकडे केली आहे.
याबाबत त्यांनी कणकवली पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर दुचाकी, चारचाकी वाहने, एसटी बसेस तसेच पादचाऱ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, रस्त्याची काही ठिकाणी मर्यादित रुंदी असल्याने कलमठ बाजारपेठ तसेच पुढील गावांमध्ये वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.
अवजड वाहने सुरू राहिल्यास वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होऊ शकते. अरुंद रस्त्यामुळे समोरासमोर अवजड वाहने आल्यास वाहतूक ठप्प होऊन चाकरमानी व स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होऊ शकते. तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची रस्त्यावर मोठी गर्दी असल्याने अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.गणेशोत्सवाच्या काळात भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत व्हावा, यासाठी मंगळवार, ८ सप्टेंबरपासून गणेशोत्सव कालावधी संपेपर्यंत कणकवली–कलमठ–आचरा मार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवून सहकार्य करावे, अशी मागणी सुप्रिया मेस्त्री यांनी केली आहे.