कणकवली, दि.१४ जून
कणकवली नगरपंचायतीच्यावतीने वैशिष्ट्यपूर्ण निधीतून कणकवली निम्मेवाडी येथे सुमारे १ कोटी रुपये खर्चातून ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ साकारण्यात येणार आहे. या उद्यानाचे भूमिपूजन सोमवार १५ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.
कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष संदेश पारकर बोलत होते यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक ,नगरसेवक रुपेश नार्वेकर संकेत नाईक , जयेश धुमाळे, लुकेश कांबळे,नगरसेविका दीपिका जाधव, जाई मुरकर यांच्यासह तेजस राणे, निकेत मूरकर, प्रसाद अंधारी, रामदास मांजरेकर व अन्य उपस्थित होते.
नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, कणकवली निम्मेवाडी येथे साडेआठ गुंठे जागेवर उभारण्यात येणाऱ्या या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी विविध खेळ साहित्य, ओपन जिम, वॉकिंग ट्रॅक, योगाभ्यासासाठी स्वतंत्र व्यवस्था तसेच छोटे व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना विरंगुळ्यासोबतच आरोग्यदायी उपक्रमांसाठीही उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून शहरातील विकासकामांना आता अधिक गती मिळेल, असा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला. या उद्यानाचा लाभ निम्मेवाडीसह सुतारवाडी, बांधकरवाडी , सिद्धार्थनगर, माऊलीनगर व अन्य भागातील नागरिकांसाठी होणार आहे.भूमिपूजनानंतर इतर विकासकामांनाही सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्यानाच्या भूमिपूजन समारंभास शहर विकास आघाडीच्या माध्यमातून विकासाला साथ देणारे राजकीय पक्षाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांनी सोमवारी होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहनही संदेश पारकर यांनी केले आहे.
या उद्यानामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्यासह नागरिकांसाठी एक आधुनिक व आकर्षक सार्वजनिक जागा उपलब्ध होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.