कणकवली : नांदगाव तिठा असलदे शाळेत सभापती हर्षदा वाळके यांचा सत्कार

शेअर करा

विद्यार्थ्यांच्या वारकरी दिंडीने वेधले लक्ष

कणकवली,दि.०४ ऑगस्ट

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव तिठा असलदे नं. ४ येथे कणकवली पंचायत सभापती हर्षदा वाळके यांचा सत्कार करण्यात आला. शाळेला कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा गौरव केला आहे.सरपंच रविराज मोरजकर यांनी पालकांच्या वतीने हर्षदा वाळके यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी आकर्षक वारकरी दिंडी काढण्यात आली. छोट्या वारकऱ्यांनी सभापती हर्षदा वाळके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या कार्यक्रमाला नांदगावचे सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच यासीन नावळेकर, केंद्रप्रमुख श्रीमती मिलन तेली, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इमाम बटवाले, उपाध्यक्ष विजय खरात, माजी उपाध्यक्षा श्रीमती फोंडके , इमाम नावलेकर , इरफान साटविलकर, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मुख्याध्यापक दिनेश जंगले तसेच असलदे तावडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक शांताराम जंगले यांचा व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सरपंच, उपसरपंच, समितीचे पदाधिकारी, माजी शिक्षक रवींद्र कुडतरकर, रश्मी कुडतरकर तसेच इतर मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.
सभापती हर्षदा वाळके यांनी , विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्य, संतुलित आहार आणि पालकांनी मुलांची घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सरपंच रविराज मोरजकर व केंद्रप्रमुख मिलन तेली यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी केले. श्रीमती रश्मी कुडतरकर यांनी आभार प्रदर्शन केले.

शेअर करा