कणकवली, दि.०८ जून
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा चर्मकार समाजाकडून तीव्र निषेध व्यक्त करून या कार्यवाहीला तीव्र विरोध दर्शविण्याचा एकमुखी निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ च्या सभेत घेण्यात आला.
अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या शासनाने हालचाली सुरू केल्याने या प्रस्तावाचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. चर्मकार समाजानेही यात आपली भूमिका जाहीर केली असून भारतीय संविधानाने अनुसूचित जातींना एकत्रितपणे दिलेल्या आरक्षणात विभागणी करण्याचा कोणताही प्रयत्न सामाजिक न्यायाच्या तत्त्वांवर आघात करणारा आहे असे जाहीर केले आहे.
न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसताना राज्य शासनाने उपवर्गीकरणाच्या दिशेने सुरू केलेली प्रक्रिया संशयास्पद व अन्यायकारक आहे. अहवालातील शिफारसी, आकडेवारी आणि निकष जनतेपासून लपवून ठेवणे हे लोकशाहीला धरून नाही.
चर्मकार समाजाची ठाम भूमिका आहे की अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये कोणतीही अंतर्गत विभागणी करण्यात येऊ नये. समाजातील विविध घटकांमध्ये संघर्ष निर्माण करणारे निर्णय शासनाने टाळावेत. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी सर्व अनुसूचित जातींना समान संधी मिळणे आवश्यक आहे. शासनाने
न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा संपूर्ण अहवाल तात्काळ जाहीर केला नाही.शासनाकडे वस्तुनिष्ठ स्वरूपाचा एम्पिरिकल डाटा उपलब्ध नाही.यामुळे
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाने मागे घ्यावा.
सर्व समाजघटकांची मते जाणून घेण्यासाठी खुली चर्चा आयोजित करावी.
जर शासनाने समाजाच्या भावना व मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर चर्मकार समाज लोकशाही मार्गाने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यास बाध्य होईल. संविधानिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी समाज एकजुटीने लढा देण्यास सज्ज असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव ,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी जाहीर केले.या बैठकीला संवैधानिक हितकारीणी महासंघाचे महेश परुळेकर,अंकुश जाधव,रमाकांत जाधव,गौतम खुडकर,शंकर जाधव,तसेच उन्नती मंडळाचे पदाधिकारी नामदेव जाधव,राजेंद्र चव्हाण,उत्तम चव्हाण,प्रकाश वाघेरकर,महेंद्र चव्हाण,महानंद चव्हाण,सुहास मोचेमाडकर,सहदेव शिरोडकर,महेश चव्हाण,यज्ञकांत शिरोडकर,संदीप चव्हाण,प्रभाकर चव्हाण,प्रकाश चव्हाण, अंकुश पवार,संतोष जाधव,प्रसाद पाताडे,नितीन पाताडे, दशरथ ओटवकर,रमेश ओटवकर,सदानंद कदम,आनंद तांबे आदी उपस्थित होते.