कणकवली सत्ताधारी कार्यकर्त्यांना मुख्याधिकाऱ्यांनी केली विचारणा ; काय केलात नियोजन?
कणकवली,दि.१० सप्टेंबर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील पटवर्धन चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या अवैध स्टॉलवरून नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील आक्रमक झाल्या. स्टॉल हटविण्याच्या कारवाईदरम्यान कणकवली सत्ताधारी कार्यकर्ते आणि स्टॉल धारकांना “हेच काय नियोजन? तातडीने काढा तो स्टॉल… तेव्हा माझ्या अंगावर आलेलात!” अशा शब्दांत मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी चांगलेच सुनावले आहे.
कणकवली शहरातील अतिक्रमण व अवैध स्टॉल हटविण्याची मोहीम यापूर्वी नगरपंचायतीकडून राबविण्यात आली होती. त्यावेळी स्टॉलधारकांच्या वतीने स्टॉल स्वतःहून हटविण्यात येतील, असे सांगण्यात आल्यानंतर कारवाईला काही काळ विराम मिळाला होता. मात्र, गणेशोत्सवाच्या तोंडावर पटवर्धन चौकात पुन्हा नव्याने स्टॉल उभारण्यात आल्याने नगरपंचायतीसमोर अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला.
या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी गौरी पाटील स्वतः कारवाईच्या ठिकाणी गुरवारी दुपारी १२ वाजता दाखल झाल्या. संबंधित स्टॉल हटविण्याची कारवाई सुरू असताना त्यांनी नगरपंचायतीतील सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना “हेच काय तुमचे नियोजन?” असा सवाल केला. यावेळी पूर्वीच्या स्टॉल हटाव कारवाईचा संदर्भ देत त्यांनी “तेव्हा माझ्या अंगावर आलेलात”, असे सुनावत नाराजी व्यक्त केली.
गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत स्टॉल अथवा अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी नगरपंचायतीकडून कारवाईचा इशारा दिला.