कणकवली : बँकिंग योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी आर्थिक प्रगती साधावी

शेअर करा

कणकवलीतील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चा ग्राहक मेळाव्यात प्रा. डॉ. भरमू नौकुडकर यांचे प्रतिपादन

कणकवली,दि.२२ ऑगस्ट

सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने नेहमीच आपल्या ग्राहकांशी केवळ आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित नाते न ठेवता कौटुंबिक जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे दृढ संबंध निर्माण केले आहेत. आजच्या बदलत्या काळात ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन बँकेकडून अनेक नाविन्यपूर्ण व फायदेशीर योजना राबविल्या जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांपासून ते व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकाने या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती साधावी, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्रा. डॉ. भरमू नौकुडकर यांनी केले.

बैंक ऑफ महाराष्ट्र, कणकवली शाखेच्यावतीने येथील रिलॅक्स हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक मेळाव्यात प्रा. डॉ. नौकुडकर बोलत होते. यावेळी रत्नागिरी क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य अधिकारी उमेश शिंदे, संतोषकुमार, विविध शाखांचे शाखा व्यवस्थापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

प्रा. डॉ. नौकुडकर म्हणाले, आर्थिक प्रगतीचा मार्ग सुकर करण्यासाठी कर्ज हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे. कर्ज घेतल्याशिवाय व्यवसायाचा विस्तार करणे किंवा नवीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांनी व व्यावसायिकांनी कर्ज घेण्यास संकोच करू नये. मात्र मिळालेल्या कर्जाच्या रकमेचा विनियोग केवळ उत्पादक कारणासाठीच केला पाहिजे.

या मेळाव्यात झोनल अधिकारी संतोषकुमार यांनी बँकेच्या गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, शेती आणि व्यावसायिक कर्जाच्या विविध योजनांची विस्तृत माहिती दिली. इतर बँकांच्या तुलनेत महाराष्ट्र बँकेचे व्याजदर अत्यंत रास्त व परवडणारे असल्याने ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय अशोक बाणे व स्वप्नील गायकवाड यांनी कार लोन, गोल्ड लोन व व्यवसाय वृद्धीसाठीच्या कर्जाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यादरम्यान घर, वाहन, उच्च शिक्षण आणि नवउद्योगांसाठी कर्ज मंजूर झालेल्या अनेक लाभार्थी ग्राहकांना मान्यवरांच्या हस्ते कर्ज मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. या ग्राहक मेळाव्याला कणकवली शहर व परिसरातील नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा