Kankavli : मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करून अटक करा

शेअर करा

काँग्रेसची कणकवली प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी ; एसआरआय प्रक्रियेत नावे वगळल्यास आंदोलन

कणकवली ,दि.०८ऑक्टोंबर

भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून, निवडणुका स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एसआरआय अर्थात ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ प्रक्रियेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जात आहे. एसआरआय प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात आहेत.त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करावी.मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करून अटक करा , अशी मागणी काँग्रेसच्या वतीने कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असतानाही त्याचा कारभार सत्ताधारी पक्षाच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. एसआरआय प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया लोकशाहीसाठी घातक आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर त्यांच्या सहकारी निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतला आहे. एसआरआय प्रक्रिया, मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे तसेच निवडणूक आयोगाच्या आयटी प्रणालीच्या केंद्रीकरणासंदर्भात मतभेद निर्माण केले आहेत.
यावेळी कणकवली तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहराध्यक्ष अजय मोरये, अनिल डेगवेकर, महेश तेली, संजय राणे, राजेंद्र कदम, बाळू मेस्त्री, वि. के. सावंत, प्रदीपकुमार जाधव यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पश्चिम बंगाल आणि बिहारमधील मतदार यादीतील नावांबाबत तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ संदर्भातही काँग्रेसने गंभीर प्रश्न उपस्थित केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेबाबत पुराव्यांसह प्रश्न उपस्थित केले होते.निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता कायम ठेवणे, मतदारांची नावे कोणत्याही कारणाशिवाय वगळली जाऊ नयेत आणि लोकशाही व संविधानाचे संरक्षण व्हावे, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करून त्यांना पदावरून हटवावे व अटक करावी, अशी मागणीही करण्यात आली.

शेअर करा