कणकवली : ‘अपयशाला घाबरू नका, मोठी स्वप्ने पाहा’ : डॉ. संजय थोरात

शेअर करा

कणकवली कॉलेजमध्ये २४ व्या विभागीय युवक महोत्सवाचा शुभारंभ ; कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग


कणकवली :

यशवंतराव मुक्त विद्यापीठाचा युवक महोत्सव हा केवळ स्पर्धेचा नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी केवळ सहभाग नोंदविण्यापुरते मर्यादित न राहता आपल्या कलागुणांचे सादरीकरण करावे. अपयशाला घाबरू नका, सकारात्मक विचार करा आणि मोठी स्वप्ने पाहा, असा संदेश त्यांनी दिला. कोकणच्या लाल मातीत अनेक मोठे कलाकार घडले आहेत. त्यामुळे या भूमीत आयोजित होत असलेल्या युवक महोत्सवाला विशेष महत्त्व आहे. आधुनिक काळात एआय आणि नवीन तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असताना आपल्या संस्कृतीचे आणि वेगळेपणाचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.हा महोत्सव कलेचा, संस्कृतीचा आणि भविष्याचा आहे.‘अपयशाला घाबरू नका, मोठी स्वप्ने पाहा’ असे आवाहन यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र कोल्हापूरचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. संजय थोरात यांनी केले.

कणकवली कॉलेजच्या एच.पी.सी.एल. सभागृहात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या विभागीय केंद्र कोल्हापूर आणि अभ्यासकेंद्र कणकवली कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ व्या विभागीय युवक महोत्सव-२०२६चा शुभारंभ विभागीय केंद्र कोल्हापूरचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. संजय थोरात यांच्या हस्ते दीपप्रज्वलन रविवारी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवलीचे सचिव विजयकुमार वळंजू, कणकवली कॉलेजचे प्राचार्य व केंद्रप्रमुख प्रा. युवराज महालिंगे, सांस्कृतिक समन्वयक प्रा. हरिभाऊ भिसे, केंद्रसंयोजक प्रा. मनोज कांबळे, संस्थेचे सदस्य अनिल डेगवेकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके,प्रा. महादेव माने, प्रा. संजय काटे, यशवंत पाटील , परिक्षक अभिनेता निलेश पवार, सुचिता गायक‌वाड, श्रीधर पाचंगे, प्रथमेश गावकर , विजय सावंत, प्रा. विजयकुमार सावंत यांच्यासह मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार वळंजू म्हणाले, मुक्त विद्यापीठ हे समाजाची गरज असून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कार्यरत आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि व्यक्तिमत्त्वाला वाव मिळावा, यासाठी युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत संशोधन, कौशल्य आणि व्यवसायाच्या संधींचाही विचार करावा, या युवक महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ख-या अर्थाने मुक्त व्यासपीठ मिळाले.

अनिल डेगवेकर म्हणाले, कला क्षेत्रातील वाटचालीसाठी कलाकारांना मोठ्या कष्टातून पुढे यावे लागते. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना सातत्याने विकसित केले पाहिजे, त्यासाठीच हा युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
प्रास्ताविकात प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे म्हणाले, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून बाहेरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचे काम सातत्याने केले जात आहे. कणकवली कॉलेजमध्ये १९९१ पासून मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र कार्यरत असून, या केंद्राने आजपर्यंत विविध शैक्षणिक व कौशल्याधारित उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. हा सहावा विभागीय महोत्सव कणकवली अभ्यासकेंद्राला आयोजित करण्याची संधी मिळाली असून तो यशस्वी होत आहे. कणकवली अभ्यासकेंद्रामध्ये पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांसोबतच नवीन कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे. रुग्णसेवा अभ्यासक्रम, योगाभ्यास तसेच भविष्यात एमबीए आणि पत्रकारिता यांसारखे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यावर्षी इंद्रधनुष्य महोत्सवाचे विभागीय आयोजन करण्याची जबाबदारी विभागीय केंद्राला मिळाली आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होऊन आपल्या कौशल्यांना आणि कलागुणांना व्यासपीठ मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युवक महोत्सवाच्या निमित्ताने कणकवली कॉलेज परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध कला व सांस्कृतिक सादरीकरणांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या विभागीय युवक महोत्सवात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अभ्यासकेंद्रांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विविध सांस्कृतिक व कलात्मक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळत आहे. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके व अ‌न्य मान्यवरांचा सत्कार शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा. मिनाक्षी सावंत यांनी मानले.

शेअर करा