कणकवली : प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सुप्त कलाकार दडलेला – संदेश पारकर

शेअर करा

कणकवली विद्यामंदीर येथे चित्रकला स्पर्धेचे उद‌्घाटन

कणकवली ,दि.१३ जुलै

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यासपीठामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होईल. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक सुप्त कलाकार दडलेला असतो. चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ असल्याचे, प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.

कणकवली विद्यामंदिर हायस्कूल येथे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेच्या उ‌द्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी विद्यामंदिर हायस्कूल चे मुख्याध्यापक टी. जे. कांबळे, नगरसेवक बाळू पारकर, नगरसेवक संकेत नाईक, शितल मांजरेकर, रामदास मांजरेकर, कलाशिक्षक आणि परीक्षक प्रसाद राणे, प्रथमेश गावकर यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर आणि नगरसेवक बाळू पारकर यांनी सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले.

नगरसेवक संकेत नाईक म्हणाले, संदेश पारकर यांचा वाढदिवस म्हणजे कणकवलीकरासांठी उत्सव असतो. संदेश पारकर हे स्वतः कलाप्रेमी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहर विकास आघाडीच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्याथ्यांच्या कलागुणांना या स्पर्धेतून व्यासपीठ मिळेल आणि चित्रकला स्पर्धेतून भविष्यातील उत्तम कलाकार घडतील.
कलाशिक्षक प्रसाद राणे म्हणाले , चित्रकला स्पर्धेतून मुलांच्या कल्पनाशक्तीला नवे पंख मिळतात आणि अशा व्यासपीठांमधूनच भविष्यातील उत्तम कलाकार घडतात.
चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. आपल्या मनातील भावना आणि विचार रंगांच्या माध्यमातून कागदावर उतरवण्यासाठी बालदोस्तांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. रंगांच्या दुनियेत विद्यार्थी दंग झाले होते.
स्पर्धेमध्ये वैविध्यपूर्ण विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वॉटर कलर, क्रेयॉन्स आणि ऑइल पेस्टल्सचा वापर करून अतिशय आकर्षक चित्रे रेखाटली. स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृतींची निवड करण्यासाठी तज्ज्ञ परीक्षक म्हणून कलाशिक्षक प्रसाद राणे, प्रथमेश गावकर यांनी काम पाहिले. ७०० विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन शहर विकास आघाडीच्या वतीने शितल रामदास मांजरेकर यांनी केले होते.

शेअर करा