पावसाने दडी मारल्याने कोकणातील शेतकरी संकटात; शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता
कणकवली, दि. १८ जून
कोकणात मान्सूनने सुरुवातीला हजेरी लावल्यानंतर आता पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. भात पेरणीची कामे पूर्ण झाल्यानंतर उगवलेली भाताची रोपे पावसाअभावी करपू लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नांदगाव येथील शेतकऱ्यांनी पंपाच्या मदतीने पाणी देण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांवर असाच पाऊस लांबला तर दुपार भात पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाच्या भरवशावर शेती करणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांना यंदा पावसाअभावी धावपळ करावी लागत आहे. अनेक ठिकाणी भात रोपांना जिवंत ठेवण्यासाठी विहिरी, ओढे आणि अन्य जलस्रोतांमधून पंपाच्या सहाय्याने पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
आधीच वाढता शेती खर्च, मजुरांची कमतरता आणि बाजारभावाची चिंता असताना आता पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास भातशेतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिला असला तरी प्रत्यक्षात पाऊस कधी बरसणार याकडे कोकणातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.