शेती व शेतीपूरक व्यवसायाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन; युवकांचा सहभाग आवश्यक
कणकवली,दि.१० सप्टेंबर
तळेरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, तळेरे, दारुम, ओझरम व साळिस्ते मर्यादित यांच्या कार्यक्षेत्रातील मुंबईस्थित तसेच स्थानिक बंधू-भगिनींसाठी बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बंधू-भगिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तळेरे येथील डॉ. श्री. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवन, वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय येथे हा मेळावा होणार असल्याची माहिती चेअरमन दिलीप तळेकर यांनी दिली.
या मेळाव्यात शेती व शेतीपूरक व्यवसाय, फळबाग लागवड, बांबूलागवड, ऊस लागवड, फळांवरील प्रक्रिया व्यवसाय, शेळीपालन, गाई-म्हशी पालन (दुग्ध व्यवसाय) तसेच कुक्कुटपालन आदी विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याशिवाय विविध व्यवसायांसाठी आवश्यक असणारे आर्थिक सहाय्य, त्यासाठीची पात्रता तसेच ७/१२ उताऱ्यावरील सहहिस्सेदारांची संमती न मिळाल्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी, याबाबतही उपस्थितांना सविस्तर माहिती दिली जाणार आहे. कार्यक्षेत्रातील ग्रामस्थ बंधू-भगिनींनी मेळाव्यास उपस्थित राहून आपल्या शंका व अडचणींचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून करून घ्यावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेषतः तरुण-तरुणींचा सहभाग अत्यावश्यक असून, शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध रोजगार व आर्थिक संधींची माहिती या मेळाव्यात मिळणार आहे.
तळेरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सचिव तसेच अध्यक्ष व संचालक मंडळाच्या वतीने सर्व बंधू-भगिनींना या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
