कणकवली,दि.२३ सप्टेंबर
कणकवली तालुक्यातील करूळ गावचे माजी सरपंच व तात्कालीन काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले दत्तात्रय देऊ फोपे (वय 85) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले. सलग 29 वर्षे सरपंच राहून करुळ गावच्या विकासामध्ये दत्तात्रय फोपे यांचे मोठे योगदान दिले होते. एक अभ्यासू व दरारा असणारे सरपंच म्हणून त्यांची ओळख होती.
आदर्श गाव व निर्मल ग्राम असे अनेक पुरस्कार त्यांच्या कारकीर्दीमध्ये करूळ ग्रामपंचायतीला मिळाले होते. शासकीय योजनांचा पुरेपूर अभ्यास असल्याने अधिकाऱ्यांना या अभ्यासाच्या जोरावर काम करायला भाग पाडणे अशी त्यांची खासियत होती. करूळ रामेश्वर सोसायटीचे चेअरमन म्हणून देखील त्यांनी काही काळ काम पाहिले होते. त्यानंतर काळात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये देखील त्यांनी काही काळ सक्रियपणे काम केले. गेले काही दिवस ते आजारी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी त्यांना मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. त्याच दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली सुन, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर गुरुवारी करूळ येथील स्मशानभूमीमध्ये सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.