कणकवली : ओरोस येथील वैद्यकीय महाविद्यालयात मोफत मणके तपासणी शिबिर

शेअर करा

दी स्पाईन फाऊंडेशन मुंबई’ यांच्यावतीने आयोजन ; तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती

कणकवली, दि. ०७ जुलै
दी स्पाईन फाऊंडेशन मुंबई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ११ जुलै रोजी ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोफत मणके तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मणक्याच्या शस्त्रक्रिया या अत्यंत गुंतागुंतीच्या, नाजूक आणि खर्चिक असतात. सामान्यतः एका शस्त्रक्रियेसाठी ८ ते ९ लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असतो, जो ग्रामीण भागातील सर्वसामान्य व गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर असतो. रुग्णांची ही आर्थिक अडचण लक्षात घेऊन या शिबिरातं तपासणी केल्यानंतर ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासेत, अशा रुग्णांवर ८ ऑगस्ट रोजी ओरोस येथेच मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. मणक्याच्या आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी ‘दी स्पाईन फाऊंडेशन मुंबई’ ही संस्था देशभरात नावाजलेली आहे. जगप्रसिद्ध निष्णात स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था गेली ३० वर्षे अविरतपणे सेवा कार्य करत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि सौराष्ट्रपासून आसामपर्यंत संस्थेचे सुमारे ५० निष्णात स्पाईन सर्जन स्वखचनि विविध, केंद्रांवर जाऊन रुग्णांची तपासणी व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करतात. जिल्ह्यात यापूर्वी ४ शिबिरे यशस्वीपणे राबविण्यात आली. रुग्णांनी रोशन कुळे ७०४५८१४३४१ व वैशाली ओटानेकर यांच्याशी संपर्क साधावी, असे आवाहन डॉ. प्रणित पावसकर यांनी केले आहे.

शेअर करा