कणकवली : गोंधळी समाजाला हक्काची जमीन व घरकुल मिळावे..

शेअर करा


नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

कणकवली, दि.१४ जून

कणकवली शहरातील वॉर्ड क्रमांक ९, १०, ११ व १२ मधील गोंधळी समाज बांधवांना हक्काची जमीन व घरकुल मिळवून देण्यासाठी जय भवानी गोंधळी समाज संघ, कणकवलीच्या वतीने नगराध्यक्ष संदेश पारकर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गोंधळी समाज गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ कणकवली परिसरात वास्तव्यास असूनही आजतागायत समाजातील अनेक कुटुंबे भूमिहीन व बेघर आहेत. हक्काची जमीन व निवाऱ्याचा अभाव असल्यामुळे समाजबांधवांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत असून त्याचा परिणाम शिक्षण, रोजगार आणि सामाजिक प्रगतीवर होत आहे.

समाज संघाने नगराध्यक्षांकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये गेल्या ५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गोंधळी समाजातील सर्व कुटुंबांची जनगणना करून भूमिहीन कुटुंबांना जमिनीचे हक्क प्रदान करावेत, नगरपंचायत अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये पात्र व गरीब कुटुंबांना प्राधान्याने पक्की घरे मंजूर करावीत तसेच कणकवलीतील सुमारे १०० गोंधळी समाजातील कुटुंबांच्या निवाऱ्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी वंचित व गरजू घटकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असल्याने या प्रश्नावरही विशेष लक्ष घालून नगरपंचायत तसेच शासकीय स्तरावर पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा समाज संघाने व्यक्त केली आहे.

यावेळी जय भवानी गोंधळी समाज संघाचे अध्यक्ष शमऱ्याप्पा इंगळे यांच्यासह वैभव इंगळे, भिमराव इंगळे, विश्वजित भिसे, बसवंत सूर्यवंशी, नारायण वॉस्टर, अनिल इंगळे, मनोहर वॉस्टर, यत्ललिंग वॉस्टर, शशिकांत इंगळे, दियक भिसे आदी उपस्थित होते.

शेअर करा