कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी गोविंद साळकर

शेअर करा

कार्याध्यक्षपदी सखाराम सकपाळ यांची निवड; पेन्शनर्सनी असोसिएशनचे सभासद होण्याचे आवाहन

कणकवली,दि.१३ ऑगस्ट

कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी गोविंद सोनू साळकर तर कार्याध्यक्षपदी सखाराम सकपाळ यांची निवड करण्यात आली. कलमठ, कणकवली येथील पेन्शनर्स भवनमध्ये झालेल्या असोसिएशनच्या सभेत ही निवड करण्यात आली.

यावेळी असोसिएशनचे कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष गोविंद साळकर यांनी पेन्शनधारकांच्या विविध समस्या व अडचणी सोडविण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी बोलताना अध्यक्ष गोविंद साळकर यांनी, “सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनसंदर्भातील विविध अडचणी दूर करण्यासाठी तसेच सेवानिवृत्तीनंतरचे जीवन निरोगी, आनंदी आणि समाधानकारक जगण्यासाठी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पेन्शनर्स असोसिएशनचे सभासद व्हावे,” असे आवाहन केले.

नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पेन्शनधारकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटनेला अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

शेअर करा