कणकवली 21 निविदा रद्द प्रकरणी 21 जुलैला होणार सुनावणी

शेअर करा

कणकवली,दि.११ जुलै
कणकवली नगरपंचायतीने ६ एप्रिल २०२६ रोजी स्थायी समितीत व १३ एप्रिल रोजी विशेष सभेत २१ निविदा रद्द करण्याच्या घेतलेल्या ठरावाच्या विरोधात मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे. या दाखल अर्जावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी म्हणणे सादर केले. याबाबतची पुढील सुनावणी २१ जुलै रोजी होणार आहे.

एप्रिलमध्ये झालेल्या ठरावानंतर तीन दिवसात मुख्याधिकाऱ्यांनी नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ३०८ (१) नुसार अर्ज दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, तशी कार्यवाही झाली नाही. याबाबत नगरसेवक बंडू हर्णे यांनी दाखल केलेला अर्ज उच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनी अर्ज दाखल केलेला नसल्याने फेटाळण्यात आला होता. तसेच संबंधित ठराव शासन निर्देशाशी सुसंगत नसल्याचा उल्लेख निकाल पत्रात होता.

दरम्यान या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी १८ जून २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदर ठराव शासन निर्देशाशी सुसंगत नसल्याने सभेचे इतिवृत्त कायम करणे याविषयी सूचीमध्ये कायम करता येणार नाही. या सदराखाली कलम ३०८ एक नुसार सदर ठरावाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे. दाखल केलेल्या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी लेखी म्हणणे सादर केले. यावर आपण वकिलांमार्फत म्हणणे सादर करते. असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले असून पुढील सुनावणी २१ जुलै रोजी होणार आहे.

शेअर करा