नगराध्यक्ष संदेश पारकर आणि बंडू हर्णे यांच्यात शाब्दिक बाचाबाची ;२१ कामांच्या फेरनिविदा काढण्याचा निर्णय
कणकवली,दि.१८ जून
नगरपंचायतीच्या प्रशासकीय राजवटीत झालेल्या २१ विकासकामांच्या निविदा रद्द करण्याच्या निर्णयावरून कणकवली नगरपंचायतीच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादंग झाला. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी निविदा रद्द करू नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. मात्र निविदा रद्द करण्याचा अधिकार मुख्याधिकाऱ्यांचा असून संबंधित प्रस्ताव आपल्याकडे आलेला नसल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांनी विरोधकांचा अर्ज फेटाळला.यानंतर सत्ताधाऱ्यांनी २१ कामांच्या फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेत ही प्रक्रिया तीन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या भालचंद्र सभागृहात बैठक झाली. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
कणकवली निम्मेवाडी येथील श्री स्वयंभू नमो उद्यानाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे यांना निमंत्रित का दिले नाही, असा सवाल नगरसेविका मेघा गांगण यांनी केला. यावर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी हा कार्यक्रम प्रशासकीय नसून नगराध्यक्षांच्या अधिकारातील असल्याचे स्पष्ट केले. प्रशासकीय कार्यक्रम असल्यास प्रोटोकॉलनुसार निमंत्रण प्रक्रिया राबवली जाते, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटविल्याबद्दल मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या भूमिकेचे नगरसेवकांनी कौतुक केले. याबाबत अभिनंदनाचा ठराव रुपेश नार्वेकर यांनी मांडला व तो मंजूर करण्यात आला. तसेच शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी दर गुरुवारी क्रीडा संकुलाच्या जागेत गावठी आठवडा बाजार भरविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. तसेच शहरातील खुले क्षेत्र विकसित करण्यासाठी पीएमसी नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जनगणनेनुसार शहरातील लोकसंख्या १५ हजार २०० असून सुमारे १२ हजार घरांचा डेटा उपलब्ध झाला आहे. अधिकृत-अनधिकृत घरांचा सर्वे करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली.बैठकीत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न, उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण तसेच विविध विकासकामांवर चर्चा झाली. काही विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाजी अनेक मुद्द्यांवर झाली.