पाच विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
कणकवली,दि.०९ऑक्टोबर
नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, वरवडे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विविध वयोगटांत विद्यार्थ्यांनी यश मिळवत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात इयत्ता आठवीतील कु. गार्गी नारकर हिने चौथा क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात इयत्ता सहावीतील कु. हसनेन शेख याने द्वितीय क्रमांक, तर त्याच वर्गातील कु. सैफ बटवाले याने तृतीय क्रमांक मिळवला. इयत्ता सातवीतील कु. मनीष गुप्ता याने चौथा क्रमांक पटकावला. तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटात इयत्ता नववीतील कु. तुभा शेख हिने चौथा क्रमांक मिळवून यश संपादन केले.
या सर्व पाचही विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे मल्लखांब प्रशिक्षक कावले सर आणि विचारे सर यांचे मार्गदर्शन व विशेष मेहनत महत्त्वपूर्ण ठरली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा. हरिभाऊ भिसे, सहसचिव प्रा. निलेश महिंद्रकर, खजिनदार सौ. शीतल सावंत, सल्लागार श्री. डी. पी. तानावडे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच आगामी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीला नवी दिशा मिळाली असून, विभागीय स्पर्धेतही विद्यार्थी चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.