कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येला मिळाला दिलासा
कणकवली,दि.०७ सप्टेंबर
कलमठ गोसावीवाडी, संचयनी आणि गजानन महाराज नगर परिसरातील ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षांपासून कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांनी नवीन ट्रान्सफार्मरची मागणी केली होती. यासाठी वेळोवेळी सरपंच संदीप मेस्त्री पाठपुरावा करण्यात आला. अखेर मंजूर झालेल्या नवीन ट्रान्सफार्मरचे आज पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले.
नवीन ट्रान्सफार्मर कार्यान्वित झाल्यामुळे गोसावीवाडी, संचयनी आणि गजानन महाराज नगर परिसरातील कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत होणार असून, ग्रामस्थांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या लोकार्पण कार्यक्रमावेळी सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच रवींद्र यादव, माजी सरपंच महेश लाड, ग्रा.प.सदस्य अनुप वारंग, नितीन पवार, सचिन खोचरे, स्वाती नारकर, श्रेयस चिंदरकर, इफत शेख, राजेंद्र मणेरीकर, प्रमोद लिमिये, परेश कांबळी, बाबू नारकर, प्रणय शिर्के, समीर रजपूत, सिद्धेश रजपूत, आकाश पाटील, आबू पाटील, विनीत रजपूत, अमित मर्तल तसेच वायरमन राहुल काळेगावकर उपस्थित होते.
नवीन ट्रान्सफार्मर मंजूर करून कार्यान्वित झाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, यासाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.