.नाटळ ग्रामपंचायत आणि तंटामुक्ती समितीचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र
कणकवली ,दि. ११ जून
नाटळ फाटा आणि राजवाडी तिठा परिसरात अपघातांचा धोका टाळण्यासाठी गतिरोधक व वाहतूक आरसा बसवण्यात यावा तसेच वाहतूक मार्गांवरील धोकेदायक झाडे तोडण्याची मागणी नाटळ ग्रामपंचायत आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंता एस आर बासुतकर यांना तंटामुक्ती समिती अध्यक्ष रवींद्र उर्फ वादळ मेस्त्री यांनी गुरुवारी लेखी निवेदन दिले.यावेळी सोसायटी संचालक दाजी गावकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
राजवाडी तिठा व नाटळ फाटा येथे महाविद्यालय व शाळा असल्याने परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सायकलवरून आणि पायी ये-जा करतात. जिल्हा परिषद महामार्गावरील नरडवे-कणकवली रस्त्यावरून वाहने अत्यंत वेगाने धावत असतात. यामुळे या भागात मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.कणकवली तालुक्यातील ‘कनेडी मल्हारी पूल ते नाटळ दिगवळे हद्द’ या नरडवे मार्गानजीक असलेली झाडे सध्या अत्यंत मोडकळीच्या स्थितीत आली आहेत. पावसाळ्यात ही झाडे रस्त्यावरून येण्या-जाणाऱ्या वाहनांवर किंवा पादचाऱ्यांवर कोसळण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते.
अतिवेगाने चालणाऱ्या गाड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या आणि पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. भविष्यात होणारे अनर्थ टाळण्यासाठी या तिठ्यावर तातडीने गतिरोधक व योग्य त्या ठिकाणी वाहतूक आरसा बसवावा तसेच संभाव्य धोका आणि जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने या धोकादायक झाडांचा त्वरित बंदोबस्त करावा,अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने तंटामुक्ती समिती अध्यक्ष रवींद्र मेस्त्री यांनी निवेदना द्वारे केली आहे.