कणकवली :लोरे नं. १ येथे जल महोत्सव व जलार्पण सोहळा उत्साहात

शेअर करा

जल जीवन मिशनच्या कामांचे लोकार्पण; पाणी बचतीचा संदेश

कणकवली,दि.१० सप्टेंबर

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लोरे नं. १ येथे जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामानिमित्त जल महोत्सव व जलार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास पंचायत समिती कणकवलीच्या सभापती हर्षदा वाळके, पंचायत समिती सदस्या मानसी मराठे, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे तसेच ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कणकवलीचे शाखा अभियंता श्री. घुरसाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना लोरे ग्रामपंचायतीचे सरपंच अजय रावराणे यांनी जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या कामांची तसेच गावात राबविण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. शाखा अभियंता श्री. घुरसाळे यांनी जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची माहिती उपस्थितांना दिली.

पंचायत समिती सदस्या मानसी मराठे यांनी सरपंच अजय रावराणे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांनी मार्गदर्शन करताना लोकसहभागातून करण्यात आलेल्या विकासकामांचे महत्त्व अधोरेखित केले.

सभापती हर्षदा वाळके यांनी आपल्या मार्गदर्शनात जीवनातील पाण्याचे महत्त्व स्पष्ट करताना पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणी बचत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे सांगितले.

यावेळी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सेवा देणारे कर्मचारी प्रकाश राणे, राजेंद्र गुरव तसेच जलसुरक्षक ओंकार एकावडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर जिल्हा परिषद शाळा लोरे नं. १ ते श्री. अनंत रावराणे यांच्या घरापर्यंत जलजागृती रॅली काढण्यात आली. अनंत रावराणे यांच्या घरातील नळ कनेक्शनचे पूजन करून जलार्पण करण्यात आले आणि जल महोत्सवाची सांगता झाली.

कार्यक्रमास उपसरपंच रसिका राणे, ग्रामपंचायत सदस्य सुमन गुरव, नरेश गुरव, सुप्रिया रावराणे, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लोरे नं. १ चे चेअरमन सुनील रावराणे, सामाजिक कार्यकर्ते मिहिर मराठे, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा