सावरकर वॉरियर्स’ आणि ‘हिंदू विधीज्ञ परिषदे’ची मागणी
कणकवली ,दि.०९ सप्टेंबर
सागरी मार्गाने होणारी प्रवासी जलवाहतूक ही केवळ श्रीमंतांपुरती मर्यादीत न ठेवता सर्वसामान्य नागरिकांसाठी लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी ‘सावरकर वॉरियर्स’ या संस्थेचे प्रमुख तथा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि हिंदू विधीज्ञ परिषदेचे सदस्य विक्रम भावे यांनी बुधवारी, दि.९सप्टेंबर रोजी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात ही संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी ते बोलत होते. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक राजेंद्र पाटील, सनातन संस्थेचे मार्गदर्शक सद्गुरू सत्यवान कदम, हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.विरेंद्र इचलकरंजीकर,सुराज्य अभियानचे डॉ.रविकांत नारकर आदी उपस्थित होते.
यावेळी विक्रम भावे म्हणाले, हवाईमार्ग, लोहमार्ग आणि रस्ते वाहतूक यांच्यापेक्षा जलमार्ग अधिक स्वस्त आणि पर्यावरण पुरक आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अहवालानुसार रस्ते वाहतुकीचा खर्च प्रतीकिलोमिटर-प्रतीटन ३.७८ रुपये, रेल्वे वाहतुकीचा खर्च प्रतीकिलोमिटर प्रतीटन १.९६ रुपये आणि जल वाहतुकीचा खर्च प्रतीकिलोमिटर प्रतीटन १.८० रुपये इतका कमी आहे. त्यामुळे केवळ रस्त्यांची कंत्राटे निघणे बंद होईल म्हणून बोट सेवेचा विचार मागे ठेवला जातो आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. रेल्वेप्रवासावर अनुदान असते म्हणून तो सर्वसामान्य जनतेला स्वस्त पडतो, निदान काही काळ या जलप्रवासालाही तसे अनुदान देता येईल, कारण त्यात रेल्वेचे रुळ, प्लॅटफॉर्म इत्यादींचा खर्च वाचतो किंवा रस्ते बनवणे, रुंदीकरण, मेंटेनन्स इत्यादींचा खर्च वाचतो. त्यामुळे हे अनुदान देणे अथवा शासकीय कंपनीच्या माध्यमातून शासनाने बोटसेवा स्वतः सुरु करणे हे सुद्धा परवडू शकते, असे मत भावे यांनी व्यक्त केले.
‘सावरकर वॉरियर्स’ चे प्रमुख रणजीत सावरकर या वेळी म्हणाले, ‘इंग्रजांनी त्यांचा व्यापार चालवण्यासाठी व वाढविण्यासाठी जलमार्गाचा पुरेपूर वापर केला. परंतु कोकणातील क्रांतीकारी विचारांचे लोक मुंबईच्या जवळ देखील येऊ नयेत, यासाठी त्यांनी प्रवासी जलवाहतूक सक्षम होऊ दिली नाही. आताचे शासन देखील इंग्रजाच्या पावलावर पाऊल टाकत आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. कोकण रेल्वेची मागणी मुळात कोकणवासियांच्या आंदोलनानंतर मार्गी लागली होती. कोकणातून मुंबईत स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या १५ लाखांच्या आसपास आहे. गणेशोत्सव आणि यात्रांच्या निमित्ताने कोकणात येणाऱ्या नागरिकांची संख्या १० ते १२ लाखांच्या आसपास आहे. हे सर्व नागरिक सण व उत्सवांसाठी कोकणात येताना रेल्वे, एस.टी. बसेस तसेच खाजगी बसेस व खाजगी गाड्या यांचा वापर करतात. कोकणात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या या अन्य राज्यांतून येणाऱ्या असतात. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षण मिळणे कठीण जाते. विना आरक्षीत प्रवास हे तर मोठे दीव्यच असते. विशेष रेल्वे गाड्या सोडूनही उत्सव काळात रस्ते वाहतुकीवरही प्रचंड ताण असतो. त्यामुळे प्रवासी जलवाहतूक हा सगळ्याच दृष्टीने उत्तम पर्याय आहे. शिवाय बंदरांचा विकास झाल्यास कोकणातील पर्यटन, बाजारपेठ विकास आणि दळणवळण अशा सर्वच दृष्टिने याचा लाभ होईल. शेजारच्या गुजरात सारख्या राज्यात हाजिरा ते घोघा ही प्रवासी जलवाहतूक यशस्वीपणे चालत आहे. सागरी किनारा लाभलेले अनेक देश आज प्रवासी जलवाहतूक यशस्वीपणे चालवत आहेत. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी ‘कोकण शक्ती’ ‘कोकण सेवक’ ‘दमानिया कॅटामरीन’ यांसारख्या प्रवासी जलवाहतूक सेवा होत्या. मात्र अन्य क्षेत्रात प्रगती करणारा महाराष्ट्र या क्षेत्रात मात्र मागे पडला आहे, असे दिसते.त्यामुळे
हा विषय गंभीर असून सुराज्य अभियानाच्या वतीने आम्ही हा मुद्दा लावून धरू असे सांगतानाच आवश्यकता भासल्यास जनतेला सोबत घेवून आंदोलन करण्यात येईल असे यावेळी ‘सुराज्य अभियान’चे डॉ. रविकांत नारकर यांनी सांगितले.ॲड.विरेंद्र इचलकरंजीकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
फोटो ओळ – कणकवली येथे ‘सावरकर वॉरियर्स’ आणि ‘हिंदू विधीज्ञ परिषद’ यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत विक्रम भावे व रणजीत सावरकर यांनी भूमिका स्पष्ट केली.