कणकवली : कणकवली टेंबवाडी येथे कल्याण मटका जुगारावर एलसीबीचा छापा

शेअर करा

एकास अटक, २७ हजारांचा मुद्देमाल जप्त ; मटका जुगार जोमात असल्याचे झाले उघड

कणकवली,दि.२६ जून

कणकवली शहरातील टेंबवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध कल्याण मटका जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी सायंकाळी छापा टाकून एका युवकाला ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा एकूण २७ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या करवाईमुळे पुन्हा एकदा मटका – जुगार जोमात असल्याचे उघड झाले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कॉंस्टेबल ज्ञानेश्वर गुरुनाथ तवटे यांना टेंबवाडी येथील नमो साईनाथाय पान शॉप टपरीमध्ये कल्याण मटका जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, पोलीस कॉंस्टेबल किरण देसाई व श्री. तवटे यांनी केली. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
या कारवाईत पंकज दिपक बागवे वय २९ वर्षे, रा. टेंबवाडी, कणकवली याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्या ताब्यातील पावती बुकाची तपासणी केली असता त्यामध्ये कल्याण मटका जुगाराचे आकडे व त्यासमोरील रकमा लिहिलेल्या आढळून आल्या. त्याच्याकडून कल्याण मटका जुगाराच्या नोंदी असलेले पावती पुस्तक, एक बॉलपेन, कार्बन पेपर, १८ हजार १० रुपये रोख रक्कम तसेच व्हिवो कंपनीचा व्ही-२२ मॉडेलचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची किंमत अंदाजे ९ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. चौकशीदरम्यान पंकज बागवे याने आपण कल्याण मटका जुगाराचे आकडे स्वीकारून हा जुगार दादा घेवारी (रा. कणकवली) याच्यासाठी चालवत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी फियार्दीत म्हटले आहे.

या कारवाईत पंच म्हणून देवराम रमेश कदम (वय ३२, रा. आशिये, टेंबवाडी) व परशुराम लखाप्पा बगले (वय ४०, रा. पोयेकरवाडी, कणकवली) यांनी सहभाग घेतला. याप्रकरणी पंकज दिपक बागवे (वय २९, रा. टेंबवाडी, कणकवली) आणि दादा घेवारी (रा. कणकवली) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर करा