महसुली प्रकरणांचा तडजोडीने व गतिमान पद्धतीने निपटारा; १६ नोव्हेंबरला विशेष सुनावणी
कणकवली,दि.२४ सप्टेंबर
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार कणकवली तहसील कार्यालयांतर्गत प्रलंबित महसुली प्रकरणे व वादांचा त्वरित आणि गतिमान पद्धतीने निपटारा करण्यासाठी सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.
या अभियानांतर्गत तहसीलदार कार्यालय कणकवली तसेच तालुक्यातील विविध मंडळ अधिकारी कार्यालयांच्या महसूल न्यायालयात प्रलंबित असलेल्या महसुली अर्धन्यायिक प्रकरणांचा आपसी तडजोडीने व गतीने निपटारा करण्यात येणार आहे. संबंधित वादी-प्रतिवादी, अपिलार्थी, गैरअर्जदार आदींना नोटीस देऊन प्रकरणे प्राधान्यक्रमाने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अभियानांतर्गत तहसीलदार कार्यालय कणकवली येथील न्यायालयातील अपील प्रकरणे (अधिकार अभिलेख, कुळकायदा/फेरफार विषयक प्रकरणे) तसेच मंडळ अधिकारी स्तरावरील सुनावणी सुरू असलेल्या तक्रारी व फेरफार नोंदी यांचा निपटारा करण्यात येणार आहे.
यासाठी सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. तहसीलदार कार्यालय कणकवली तसेच कणकवली, वागदे, कळसुली, तळेरे, हुंबरट, फोंडाघाट, सांडवे, खारेपाटण आणि नांदगाव येथील संबंधित मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
या लोकअदालतीमध्ये प्रलंबित दावे, हरकती व अपील प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी संबंधित कार्यालयात महसूल लोकअदालत घेण्यात येणार आहे.तहसीलदार कार्यालय कणकवली यांनी सर्व संबंधित हितसंबंधित, पक्षकार, अर्जदार व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या प्रलंबित महसुली प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी संबंधित महसूल न्यायालयाशी विहित कालावधीत संपर्क साधून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार
दीक्षित देशपांडे यांनी केले.