Kankavli : विकासाला गती देण्यासाठी नगराध्यक्ष आपल्या दारी उपक्रम – संदेश पारकर

शेअर करा

१ कोटी ७६ लाखांच्या पाच कामांची भूमिपूजने ; रस्ते, गटारे, फुटपाथ आणि सोलर पथदीपांची कामे मार्गी

कणकवली,दि.१९ ऑक्टोंबर

कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील पाच महत्त्वाच्या कामांचे सुमारे १ कोटी ७६ लाख रुपयांच्या कामांची भूमिपूजने करण्यात आली. शहरातील रस्ते, गटारे, फुटपाथ आणि सोलर पथदीपांच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. शहरातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावत विकासाला गती देण्यासाठी नगराध्यक्ष आपल्या दारी हा उपक्रम राबण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, सुमेधा अंधारी, जाई मुरकर, सत्यजित पारकर, लुकेश कांबळे आदी उपस्थित होते.
संदेश पारकर म्हणाले,कणकवली शहरातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी पाच कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये साटम घर ते वळी रस्ता रुंदीकरण व नूतनीकरणासाठी सुमारे ६५ लाख ,गणपती साना- कांदळकर घर ते कला महाविद्यालयापर्यंत गटार बांधकामासाठी सुमारे ३० लाख ,संतोष सावंत घर ते जुना नरडवे रस्त्यावरील फुटपाथ व गटार बांधकामासाठी सुमारे २६ लाख रुपये ,निम्मेवाडी येथील दुखंडे घर परिसरात पाण्याशी संबंधित बांधकामासाठी सुमारे २० लाख,चौडेश्वरी मंदिर ते रिंग रोड परिसरात फेज-१ व फेज-२ अंतर्गत सोलर पथदीप व्यवस्था व जिल्हा स्तरीय निधीतून २८ कोटी रुपयांच्या अन्य विकासकामांची यादीही देण्यात आली आहे. शहरातील सर्व १७ प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने विकासकामे राबविण्यात येणार आहेत. निधी उपलब्ध झाल्यानंतर संबंधित कामांचे ठराव, निविदा प्रक्रिया आणि वर्क ऑर्डर पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात येईल.शहरातील काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांसाठी सुमारे 11.5 कोटी , प्रसाधनगृहांच्या कामांसाठी 1.5 कोटी रुपये उपलब्ध आहेत. नगरपंचायतीने यापूर्वी रद्द केलेल्या २१ कामांच्या निविदांबाबतची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात असून जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्णय झाल्यानंतर ही कामे सुरु करण्यात येतील, असा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला.

बॉक्स –
पर्यटन महोत्सव भरवणार –
कणकवली शहरातील सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक उपक्रमांना चालना देण्यासाठी यंदा पर्यटन महोत्सव भरवण्यात येणार आहे. हा महोत्सव डिसेंबरमध्ये किंवा मे महिन्यात, याबाबत नियोजन सुरु आहे. ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत प्रभागनिहाय नागरिकांशी संवाद साधला जाणार असल्याचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले.

शेअर करा