कणकवलीत संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
कणकवली,दि.१४ जुलै :
जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ हीच माझी खरी ऊर्जा, संपत्ती आहे. तब्बल १६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मी पुन्हा नगराध्यक्ष झालो आहे. जीवनात मी अनेक संकटे व आव्हानांचा सामना केला. मात्र, मी कधीच खचलो नाही. कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत शहरवासीयांनी मला नगराध्यक्षपदावर निवडून दिले. शहरवासीयांची विकासाची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, ती सत्यात उतरविण्यासाठी त्याग करण्याची माझी तयारी आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कणकवली शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच शहराचा शाश्वत व सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.
संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त व कै. सुबोध टिकले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसील सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. आरंभी मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी श्री. पारकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार विजय सावंत, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, नगरसेविका सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, जाई मुरकर, अवधूत मालंडकर, अनिल डेगवेकर, डी. पी. तानवडे, डॉ. अनंत नागवेकर, डॉ. नितीन साळुंखे, नीलम सावंत-पालव, भाई परब, दिव्या साळगावकर, वैद्येही गुडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. पारकर म्हणाले, माझ्या वाढदिवसा दिवशी माझा जीवलग मित्र सुबोध टिकले यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी मी माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ गेली काही वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करीत आहे. मी माझ्या आयुष्यात खूप संघर्ष करीत आव्हाने व संकटांचा सामना करीत आलो आहे. या परिस्थिती मी कधीही खचलो नाही. कारण जनतेचे प्रेम, अशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचे नि:स्वार्थ पाठबळ असल्याने मी आव्हाने व संकटांचा सक्षमपणे सामना करू शकलो, अशी कबुली पारकर दिली.
कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत शहरवासीयांनी शहर विकास आघाडीच्या हाती सत्ता देऊन इतिहास घडविला. शहरवासीयांनी माझ्या खांद्यावर नगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी आहे. माझ्या वाढदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शहरात अद्ययावत प्रसाधनगृह उभारण्यासाठी दीड कोटींचा निधी मंजूर केला आहे. मंत्र्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शहरवासीयांना दिलेले गिफ्ट आहे. शहरातील उड्डाणपुलाखाली परिसराचे नगरपंचायतीच्या माध्यमातून सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी या परिसरातील स्टॉलसह अन्य विक्रेत्यांना हटविण्यास आले आहे. त्यांच्या पुनर्वसन करण्यासाठी न. पं. व्यापारी संकुलात जागा उपलब्ध करू देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे पारकर यांनी सांगितले.
सुशांत नाईक म्हणाले, संदेश पारकर यांचा वाढदिवस हा एखाद्या उत्सवाला सारखा असतो. गेली कित्येक वर्षे पारकर यांचा वाढदिवस जिल्ह््यात उत्सवासारखा साजरा केला जात आहे. कणकवली शहराच्या विकासाचे उत्तरदायित्व जनतेने आमच्यावर सोपवले आहे. हे दायित्व आम्ही निभावत असताना कणकवली स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी कटिबद्ध आहोत.
संकेत नाईक यांच्यासह मान्यवरांनी मनोगते व्यक्त करताना पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना नगराध्यक्षपदानंतर अन्य मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळो, अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त संदेश पारकर प्रेमींतर्फे केक कापण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. विठ्ठल गाड यांच्या संजीवनी पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. दिवाकर मुरकर यांनी केले. या कार्यक्रमानंतर संदेश पारकर प्रेमींनी पारकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.