कणकवली : संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचा स्मृती कलश आज सिंधुदुर्गात

शेअर करा

कणकवली,दि.०८ ऑगस्ट

श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘संत शिरोमणी श्री गुरु रविदासजी महाराज समरसता संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत संत रविदास महाराज यांचा स्मृती कलश आज, शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहे.

श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६५० वी जयंती २० फेब्रुवारी २०२७ रोजी साजरी होणार आहे. गुरुपौर्णिमेपासून म्हणजेच २९ जुलै २०२६ पासून जयंतीपर्यंत हे अभियान राबविण्यात येत असून, सामाजिक एकता, समता आणि बंधुभावाचा संदेश समाजात पोहोचविणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

स्मृती कलशाचे पूजन आज सकाळी १० वाजता पटवर्धन चौक, कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर हा कलश संत रविदास भवन, हुमरमळा, ता. कुडाळ येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संत रविदास महाराजांचे अनुयायी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.

या अभियानाचे संयोजक संतोष कानडे, तर सहसंयोजक श्रीकृष्ण परब आहेत.

शेअर करा