खा. नारायण राणे व निलम राणे यांनी दिल्या संदेश पारकर यांना शुभेच्छा ; भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा
कणकवली,दि.१४ जुलै
कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज वाढदिवसादिवशीच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांची कणकवलीतील ओम गणेश या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खा. नारायण राणे यांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान , कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर संदेश पारकर सर्वच राजकीय पक्षांच्या संपर्कात आहेत. कणकवलीत नगरपंचायत निवडणूकीत आ. निलेश राणे यांनी संदेश पारकर यांच्या विजयात शहरविकास आघाडीच्या माध्यमातून सिंहाचा वाटा उचलला होता. त्यानंतर संदेश पारकर यांच्या पक्षांतराच्या चर्चा गेल्या महिन्यांपासून सुरु आहेत. परंतु, काही दिवसापासून संदेश पारकर कुठल्या पक्षात प्रवेश करणार ? याकडे सर्वांचेच लक्ष असतानाच थेट खा. नारायण राणे यांच्या निवासस्थानी जात संदेश पारकर यांनी भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी खा.नारायण राणे व नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यामध्ये विविध विकासात्मक मुद्दांवर चर्चा झाली. खा. नारायण राणे यांनी संदेश पारकर यांना कणकवली शहरात चांगला विकास करा, अशा सुचना दिल्या. घरात संदेश पारकर यांचे आगमन होताच… खा. राणे यांनी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने या भावी खासदार असे बोलत संदेश पारकर असे बोलत संदेश पारकर यांचे स्वागत केले . जिल्ह्यात संदेश पारकर यांचे भावी खासदार , भावी आमदार या आशयाखाली लागलेल्या बॅनरच्या पार्श्वभूमीवर खा. नारायण राणे यांनी श्री. पारकर यांना गोड शुभेच्छा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
यावेळी खा. राणे यांच्या पत्नी निलमताई राणे , जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत , लायन्स क्लबचे अध्यक्ष दिवाकर मुरकर , अवधुत मालंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
