कणकवली तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करुळचा दणदणीत विजय

शेअर करा

कणकवली,दि.१२ सप्टेंबर

   कणकवली तालुका क्रीडा समिती आणि नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करुळ यांच्या संयुक्त विद्यमाने नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करुळ येथे कणकवली तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा २०२६ अंतर्गत कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. ८ व ९ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील अनेक संघांनी सहभाग घेतला. 

  स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांमध्ये अनेक मातब्बर व बलाढ्य संघांचा समावेश होता. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत चुरशीचे सामने पाहायला मिळाले. आपल्या उत्कृष्ट खेळाचे सातत्यपूर्ण प्रदर्शन करत नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करुळच्या मुलांच्या संघाने सर्व प्रतिस्पर्धी संघांवर मात करत विजेतेपद पटकावले.तसेच दिनांक 8 रोजी झालेल्या मुलींच्या कबड्डी स्पर्धेत प्रशालेचा 17 वर्षाखालील मुलींचा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. या शानदार कामगिरीमुळे करुळच्या नाथ पै ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

 या विजयामध्ये खेळाडूंची मेहनत, जिद्द, संघभावना आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यांचा महत्त्वाचा वाटा राहिला. प्रतिकूल परिस्थितीतही खेळाडूंनी आत्मविश्वासाने आणि खिलाडूवृत्तीने सामने खेळत आपले कौशल्य सिद्ध केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करुळचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री नारकर सर,सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. नियोजनापासून ते स्पर्धेच्या प्रत्यक्ष आयोजनापर्यंत प्रत्येकाने दिलेल्या योगदानामुळे ही स्पर्धा उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

शेअर करा