कणकवली पंचायत समिती सभेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना सदस्यांनी सुनावले; ग्रामीण भागातील खंडित वीजपुरवठ्यावर नाराजी
पाणीटंचाई टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन; बंद एसटी बस, महामार्गावरील बंद सौरदीप आणि शिक्षकांच्या प्रश्नांवरही चर्चा
कणकवली,दि.२२ ऑक्टोंबर
तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, महावितरणच्या सेवांबाबत ग्राहकांमध्ये असलेली नाराजी आणि स्मार्ट मीटर बसविण्याचा मुद्दा कणकवली पंचायत समितीच्या मासिक सभेत चांगलाच गाजला. आधी ग्राहकांना दर्जेदार सेवा द्या, गावागावांतील वीज समस्या सोडवा आणि विनाखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करा, त्यानंतर स्मार्ट मीटर बसविण्याचा आग्रह धरा, अशा शब्दांत पंचायत समिती सदस्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
कणकवली पंचायत समितीची मासिक सभा सभापती हर्षदा वाळके यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या पू. भालचंद्र महाराज सभागृहात पार पडली. यावेळी उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, तसेच पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे, गुरुनाथ वर्देकर, सहदेव खाडये, पवन भालेकर, राजेश जाधव, गुरुनाथ शिंदे, महेश्वरी चव्हाण, मनस्वी मराठे यांच्यासह अन्य सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर सदस्यांमध्ये मतमतांतरे
सभेत स्मार्ट मीटर बसविण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. काही सदस्यांनी स्मार्ट मीटरच्या सक्तीला विरोध केला, तर काहींनी त्याचे समर्थन केले. कोकणातील ग्राहक नियमितपणे वीजबिल भरत असताना त्यांच्यावर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती का केली जात आहे, असा सवाल गुरुनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. घाटमाथ्यावरील भागाच्या तुलनेत कोकणात वीजचोरीचे प्रमाण कमी असल्याचे मत मांडत त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष या बाबीकडे वेधले.
स्मार्ट मीटर बसविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी ज्या तत्परतेने काम करतात, त्याच तत्परतेने ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याच्या समस्या सोडवाव्यात. ग्राहकांना चांगली सेवा मिळत नसेल, तर स्मार्ट मीटरबाबतचा आग्रह कसा योग्य ठरेल, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.
महामार्गावरील बंद सौरदीपांबाबत नाराजी
मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथे महिनाभरापूर्वी बसविण्यात आलेला सौरदीप बंद असल्याची बाब लक्ष्मण गावडे यांनी निदर्शनास आणून दिली. बंद सौरदीपांचा प्रश्न सभेत वारंवार मांडूनही कार्यवाही होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. महामार्गालगत बंद असलेल्या सौरदीपांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी आणि संबंधित ठेकेदाराशी पत्रव्यवहार करावा, अशी सूचना त्यांनी केली. तसेच ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवकांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याची मागणीही त्यांनी केली.
तिवरे-डामरे मार्गावरील एसटी बस सुरू करण्याची मागणी
तिवरे-डामरे मार्गावरील एसटी बस बंद असल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा मानसी मराठे यांनी उपस्थित केला. याबाबत वारंवार सांगूनही कार्यवाही होत नसल्याने त्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. बससेवा तातडीने सुरू न झाल्यास ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना सोबत घेऊन कणकवली एसटी आगारावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला. लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नसतील, तर बैठकीला उपस्थित राहण्याचा उपयोग काय, असा सवालही सदस्यांनी केला.
क्रीडा स्पर्धांतील गैरसोयी आणि शाळांच्या प्रश्नांवर चर्चा
शिक्षण विभागातर्फे कासार्डे येथे आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याची बाब लक्ष्मण गावडे यांनी मांडली. भविष्यात स्पर्धांचे आयोजन करताना खेळाडूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे आणि उन्हाचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना सभापती हर्षदा वाळके यांनी शिक्षण विभागाला केली.
नाटळ-खांदरवाडी येथील शाळेच्या परिसरात शाळा असल्याचा फलक लावण्यात आलेला नसल्याने तो तातडीने लावण्याची सूचना सायली कृपाळ यांनी केली. हरकुळ बुद्रुक येथील उर्दू शाळेतील शिक्षकांच्या प्रश्नावर वारंवार सूचना करूनही कार्यवाही होत नसल्याबद्दल सभापती वाळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रश्नावर तातडीने कार्यवाही न झाल्यास लोकप्रतिनिधी शाळेला भेट देतील, असा इशारा त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिला. पंचायत समिती परिसरातील बंद असलेले आधार केंद्र पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही सभापती वाळके यांनी दिली.
याशिवाय, शासनाकडून प्राप्त झालेल्या सुधारित परिपत्रकांचे वाचन करण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गालगत साकेडी परिसरात वाढलेली झाडी-झुडपे तातडीने हटविण्याची सूचना सोनू सावंत आणि लक्ष्मण गावडे यांनी केली.
पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करा!
आगामी काळात एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कणकवली तालुक्यात आवश्यक उपाययोजना करण्यावर सभेत भर देण्यात आला. पाणीटंचाई प्रतिबंधक कामे आणि आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली. संभाव्य दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी पाणी आणि चारा उपलब्ध राहावा, यासाठी नियोजन करण्याचे ठरले.
तालुक्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच दक्ष राहावे. नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा, अनावश्यक पाणीवापर टाळावा आणि पाण्याची बचत करावी, असे आवाहन सदस्यांनी केले.
सभेच्या अखेरीस सभापती हर्षदा वाळके आणि उपसभापती सोनू सावंत यांनी सदस्य व प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी एकत्रितपणे काम करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. विविध प्रश्नांवर चर्चा करताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.