कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांचे गौरवोद्गार; संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान
कणकवली,दि.१८ ऑक्टोंबर
सामाजिक बांधिलकी जपत निःस्वार्थ भावनेने समाजासाठी काम करणारे नेतृत्व ही काळाची गरज आहे. संदीप चौकेकर यांच्यासारखी समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वे समाजात निर्माण झाली, तर गाव, वाडी आणि समाजाची निश्चितच प्रगती होईल. त्यामुळे अशा नेतृत्वाला समाजाने साथ देऊन त्यांचे कार्य पुढे नेण्याची गरज आहे, असे गौरवोद्गार कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी काढले.
संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सव २०२६ अंतर्गत विराजमान असलेल्या नवदुर्गा मातेचे दर्शन घेण्यासाठी कणकवली तालुक्यातील पत्रकारांनी उपस्थिती लावली. यावेळी पत्रकारांनी देवीचे दर्शन घेतले. संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने सर्व पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भगवान लोके यांनी संदीप चौकेकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

यावेळी संदीप चौकेकर मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप चौकेकर, कृष्णा यादव, यांच्यासह पत्रकार लक्ष्मीकांत भावे, राजन चव्हाण, उमेश बुचडे, संजय बाणे, तुळशीदास कुडतरकर, विराज गोसावी, आनंद तांबे आदी उपस्थित होते.
भगवान लोके म्हणाले की, संदीप चौकेकर हे समाजातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून त्यांनी ग्रामीण भागात सामाजिक कार्याची चळवळ उभी केली आहे. केवळ आर्थिक संपन्नता असून उपयोग नाही, तर त्या संपन्नतेचा उपयोग समाजातील गरजू घटकांसाठी करण्याची भावना महत्त्वाची असते. ही भावना संदीप चौकेकर यांच्या कार्यातून दिसून येते. निःस्वार्थ भावनेने समाजासाठी काम करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
कणकवली तालुका पत्रकार संघाच्या विविध उपक्रमांनाही संदीप चौकेकर यांचे नेहमी सहकार्य मिळत असते. नांदगाव पंचक्रोशी व दशक्रोशीतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यासाठी सहकार्याची विनंती केली असता, त्यांनी जवळपास साडेतीनशे डझन वह्या उपलब्ध करून दिल्या. या माध्यमातून परिसरातील सुमारे १५ ते २० शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळपास पाच हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची जाणीव ठेवून केलेले हे सहकार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे भगवान लोके यांनी नमूद केले.
ग्रामीण भागात सामाजिक कार्याची चळवळ उभी करून विविध घटकांना मदतीचा हात देण्याचे काम संदीप चौकेकर करीत आहेत. अशा व्यक्तींना समाजाने पाठबळ देणे आवश्यक आहे. समाजासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी लोक उभे राहिले, तर गावांचा आणि संपूर्ण समाजाचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो. त्यामुळे अशा नेतृत्वाचे कार्य ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
संदीप चौकेकर यांच्या सामाजिक कार्याची अनेक उदाहरणे देता येतील. त्यांच्या कार्यामागे समाजाच्या प्रगतीची तळमळ असून, ग्रामीण भागातील लोकांसाठी काहीतरी सकारात्मक करण्याची धडपड दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्हा आणि कणकवली तालुक्याच्या प्रगतीसाठी त्यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत, असे गौरवपूर्ण उद्गारही भगवान लोके यांनी काढले.
यावेळी त्यांनी संदीप चौकेकर यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आई भवानी माता आणि दुर्गामातेच्या आशीर्वादाने त्यांच्या व्यवसायात तसेच सामाजिक कार्यात अधिकाधिक यश मिळो आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा घडत राहो, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.